शौचालयाविना रहिवाशांची फरपट
खारदेवनगर परिसरातील रहिवाशांचा उपोषणाचा इशारा
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : चेंबूर येथील खारदेवनगर परिसरातील शौचालय पालिकेने पुनर्बांधणीकरिता गेल्या कित्येक दिवसांपासून जमीनदोस्त केले आहे. दोन वेळा भूमिपूजनाचा नारळ फोडून अद्याप जैसे थे परिस्थिती आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना शौचाकरिता अर्धा किलो मीटर फरपट करावी लागत आहे.
चेंबूर येथील अरविंद व नागेश पाटील वाडीतील रहिवाशांना पालिका एम पश्चिम विभागाने अनंत मित्रमंडळ परिसरात दुमजली शौचालय बांधून दिले होते. परंतु हे शौचालय पालिका व ठेकेदार यांच्या निष्काळजीमुळे जमीनदोस्त करण्यात आले आहे. त्यामुळे आता शौचासाठी जायचे कुठे, असा प्रश्न हजारो रहिवाशांना पडला आहे.
पालिका अधिकाऱ्यांनी या शौचालयाची पुनर्बांधणी करण्याचे ठरवून २०२२ साली रहिवाशांना वापरण्यास मनाई केली.
पालिकेने शौचालण्याचे काम दिलेल्या विकसकाने अचानक एसआरए प्रकल्पाचे नाव पुढे करीत शौचालय तोडून टाकले होते. पालिकेने शौचालय बांधून देण्याचे आदेश विकसकाला दिले, मात्र विकसकाने त्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी पालिकेने मध्यस्थी केल्यावर विकासकाने नाइलाजास्तव नोव्हेंबर २०२२ मध्ये शौचालयाचे काम केले होते. मात्र त्यात रहिवाशांना बसण्यास खूप अडचणी येत होत्या. गेल्या तीन वर्षांपासून रहिवाशांना ही समस्या भेडसावत होती. शेवटी पालिका एम पश्चिम अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून संतप्त रहिवाशांनी दोन महिन्यांपूर्वी पालिका कार्यालयावर ‘टमरेल’ मोर्चा काढला होता.
पालिका एम पश्चिम सहाय्यक आयुक्तांनी तत्काळ या मोर्चाची दखल घेऊन शौचालयाचे बांधकाम करण्याकरिता निधी उपलब्ध करून दिला होता. या शौचालयाच्या भूमिपूजनाचा नारळ ऑगस्ट २०२५मध्ये फोडण्यात आला होता. दरम्यान, ठेकेदाराने शौचालयाचे एकूण तीन ते चार दिवस काम करून संपूर्ण जीर्ण शौचालय जमीनदोस्त करून टाकले.
याबाबत रहिवाशांनी ठेकेदाराला जाब विचारला होता, मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन पालिकेकडे बोट दाखविले. पालिकेची प्रत्येक नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी असतानादेखील पालिका अधिकारी रहिवाशांचा मूलभूत अधिकार हिरावून घेत आहेत. याला सर्वस्वी जबाबदार पालिका अधिकारी असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून पालिका अधिकाऱ्यांनी विकसकाच्या मर्जीनुसार आम्हाला शौचालयापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला व अपंगांना शौचालयाकरीता वणवण फिरण्याची वेळ आली आहे. पालिका अधिकारी, विकसक व एसआरए विभाग आमची चक्क फसवणूक करीत आहेत. या सर्वांची चौकशी करण्यात यावी. ठेकेदार व विकसकाला काळ्या यादीत टाकावे. पालिकेने हे शौचालयाचे बांधकाम त्वरित करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अरविंद व नागेश पाटील वाडी स्थानिक कृती समितीचे अध्यक्ष दिनेश चिंदरकर, मुख्य सल्लागार मंगेश मुंडे आणि सचिव शरद मुंडे यांनी दिला आहे.
मी ८० वर्षांची वृद्ध महिला आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून या परिसरातील शौचालयाची खूपच वाईट अवस्था आहे. शौचालयासाठी रात्री-अपरात्री दूर जावे लागत आहे. पालिकेने हे काम बंद केले आहे. खूप त्रास होत आहे. पालिका अधिकारी आमच्या जीवाशी खेळत आहेत.
- इंदिरा आंग्रे, ज्येष्ठ नागरिक
केंद्र व राज्य सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरोघरी शौचालय बाधण्याकरिता नागरिकांना परावृत्त करीत असताना आमचे शौचालय करण्याचा हक्क पालिका हिरावून घेत आहे. याला जबाबदार पालिका, एसआरए व विकसक आहे.
- दिनेश चिंदरकर,
अध्यक्ष अरविंद व नागेश पाटील वाडी स्थानिक कृती समिती
सध्या परिसरात एसआरए प्रकल्प सुरू आहे. त्यामुळे पालिका काम करू शकत नाही; मात्र पालिकेकडून काही सुविधा पुरण्यात येईल का, याबाबत चर्चा करीत आहोत.
- शंकर जयसिंग भोसले,
सहाय्यक आयुक्त, एम पश्चिम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.