बदलापुर, ता. १४ (बातमीदार) : शहरात प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील थ्रो-बॉल स्पर्धा स्पर्धा ५ ते ७ डिसेंबर दरम्यान पश्चिमेकडील सेंट अँथोनी इंग्लिश हायस्कूल या शाळेच्या पटांगणात पार पडणार आहे. शाळा स्पर्धेचे यजमानपद भूषवणार असून, देशभरातून अनेक संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती शाळेच्या विश्वस्त शीतल टेंबुर्लेकर यांनी दिली.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे परीक्षक श्रीकांत दास गुप्ता, जे या क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभवसंपन्न आहेत. हे स्पर्धेचे परीक्षण करतील. सेंट ॲन्थोनी इंग्लिश हायस्कूल नेहमीच शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि साहित्य या क्षेत्रात अनेक स्पर्धा आयोजित करत आलेली आहे. यंदा पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर थ्रो-बॉल स्पर्धा होत आहे. वर्षभर शाळा प्रशासनाने या स्पर्धेसाठी आवश्यक परवानग्या आणि नियोजन प्रक्रिया पूर्ण केली आहे. स्पर्धेत देशभरातून २४ मुले व मुलींचे संघ सहभागी होणार आहेत. शाळा प्रशासन स्पर्धकांच्या राहण्याची, अन्न, आरोग्य व सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी घेणार आहे. स्पर्धेच्या प्रास्ताविकेसाठी रविवारी (ता. १२) शाळेत पत्रकार परिषद झाली. या वेळी स्पर्धेचे मेस्कोट, महाराष्ट्राचे राज्य पशू ‘शेकरू’ याचे चित्र मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. स्पर्धेसाठी आवश्यक सामग्री, साहित्य, विजयी चषक आणि बक्षिसांसाठी शाळेला प्रायोजकांचे सहकार्य मिळाल्याचे शाळा व्यवस्थापकांनी सांगितले. महाराष्ट्र संघातून शाळेतील विद्यार्थ्यांची निवड झाली, तर शाळेचा आनंद दुप्पट होईल. ही स्पर्धा बदलापूरचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावणारी ठरणार आहे, असे टेंबुर्लेकर यांनी सांगितले