वांद्रे पूर्वेतील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
धारावी, ता. १४ (बातमीदार) : देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे. असे कृत्य करणाऱ्या वकिलावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार संघाने केलेली आहे. या घटनेविरोधात जनतेच्या मनात प्रचंड असंतोष खदखदत आहे. याविरोधात वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयावर बुधवारी (ता. १५) सकाळी १०.३० वाजता मोर्चा धडकणार आहे. धारावी, कुर्ला, पवई, चेंबूर आदी विभागातून मोठ्या संख्येने लोक सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांनी दिली. तसेच हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माने यांनी केले आहे.