‘पीपल्स नाइट हायस्कूल’चे विद्यार्थी दहशतीखाली!
हुल्लडबाज तरुणांवर कारवाईची मागणी
मुंबई, ता. १४ : भायखळा येथील पीपल्स इंग्लिश नाइट हायस्कूल रात्र शाळेतील विद्यार्थ्यांना समाजकंटक, अनोळखी हुल्लडबाज तरुणांकडून त्रास होत आहे. आग्रीपाडा पोलिसांनी शाळा परिसरात सायंकाळी गस्त घालून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शाळेचे विश्वस्त शरीफ खान आणि प्राचार्य परवीन खान यांनी केली आहे.
भायखळा पश्चिमेतील मुंबई अग्निशमन मुख्यालयापासून जवळच असलेल्या मेघराज सेठी महापालिका शाळेत सायंकाळी ६:३० ते रात्री ९:३० या वेळेत पाचवी ते दहावीचे वर्ग भरतात. शाळा सुटलल्यानंतर शाळेच्या गेटसमोर तसेच दोन्ही बाजूच्या मुख्य नाक्यावर अनोळखी तरुण आणि काही समाजकंटक उभे राहून विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना दगड मारणे, शिट्या मारणे, लेझर मारणे असे प्रकार करतात. दुचाकीवरुन आलेले तरुण वाहनांचा आवाज काढत मुलींनाही त्रास देतात. सध्या सहामाही परीक्षा सुरू असून, हुल्लडबाजीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ या शाळेच्या मार्गावर फिरणाऱ्या तरुणांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.