दिवाळी, हिवाळ्यातील प्रदूषण रोखण्यासाठी पालिका सज्ज
बांधकामांच्या ठिकाणी उपाययोजना करणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ ः मुंबईत दिवाळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होते. सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी होते. सध्या मोठ्या प्रमाणात मुबईत बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे वातावरणात धूळ निर्माण होत आहे. त्याची प्रदूषणात भर पडते. तसेच हिवाळ्यात प्रदूषण आणि थंडी यामुळे आजारपण वाढण्याची शक्यता आहे.
प्रदूषण आणि हिवाळ्यातील आजारपण लक्षात घेऊन पालिका प्रदूषण रोखण्यासाठी सज्ज झाली आहे. दिवाळी आणि त्यापाठोपाठ हिवाळ्यात वाढते प्रदूषण रोखण्यासाठी पालिका सतर्क झाली आहे.
यंदा पाऊस लांबल्यामुळे पावसामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला. पावसाळ्यात बांधकामे सुरू नव्हती. त्यामुळे बांधकामामुळे होणारी धूळ नव्हती. आता पाऊस थांबला आहे. त्यामुळे बांधकामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे पुन्हा वातावरणात धूळ मोठ्या प्रमाणात पसरू लागल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावरची धूळही वाहनांमुळे पसरू लागली आहे.
बांधकामांमुळे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रस्त्यांवर पाणी मारणे तसेच पालिकेने तयार केलेल्या नियमावलीचे बांधकामाच्या ठिकाणी तंतोतंत अवलंब करा, अशा सूचना पालिकेने दिल्या आहेत. त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही, याची पडताळणी करण्याची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांवर सोपविली आल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी केली जाते. आतापासूनच फटाके वाजवणे सुरू झाले आहे. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाशी समन्वय साधून पालिका उपायोजना करीत आहे. पर्यावरणाची काळजी घेत आणि सुरक्षिततेचे नियम पाळत मुंबईकरांनी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास १०१ व १९१६ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
अग्निशमन दलाचे आवाहन
दिवाळीत फटावे उडविताना, फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. यासोबतच फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायुप्रदूषण होणार नाही, याबाबत मुंबईकरांनी दक्ष राहावे, असे आवाहन अग्निशमन दलाने केले आहे. दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास तत्काळ १०१ किंवा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक १९१६ यावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
फटाके फोडताना काय काळजी घ्याल?
सुती कपडे परिधान करावेत, फटाके मुलांपासून लांब ठेवावेत. मुले फटाके फोडत असल्यास मोठ्यांनी सोबत राहावे, फटाके फोडताना नेहमी पादत्राणे वापरावीत, फटाके फोडताना, पाण्याने भरलेली बादली जवळ ठेवावी व कोणाला भाजल्यास तत्काळ त्या ठिकाणी भरपूर स्वच्छ पाणी ओतावे, फटाके फोडण्यासाठी अगरबत्ती व फुलबाजाचा वापर करावा, इमारतीत व जिन्यावर, तसेच टेरेसवर फटाके फोडू नयेत, फटाके पेटवण्यासाठी आगकाडी अथवा लायटरचा वापर टाळावा. झाडे, विद्युत तार किंवा उंच इमारतीजवळ हवेत उडणारे फटाके फोडू नयेत, खिडक्यांच्या पडद्याजवळ पणत्या, दिवे लावू नयेत. विजेच्या तारा, गॅस पाइपलाइन किंवा वाहनांजवळ, वाहनतळाच्या ठिकाणी फटाके फोडू नयेत. घर, इमारत, परिसर इत्यादी ठिकाणी विद्युत रोषणाई करताना अधिकृत विद्युत तंत्रज्ञांची मदत घ्यावी. तसेच निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेचे विद्युत भार होणार नाही, याची काळजी घ्यावी.