पत्रीपुलावर अवजड वाहनांची धाव
नागरिकांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे मौन
टिटवाळा, ता. १८ (वार्ताहर) : शहरातील पत्रीपूल परिसरात अवजड ट्रक आणि कंटेनरची वाहतूक दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या अरुंद रचनेवरूनही ही अवजड वाहने निर्धोकपणे धावत आहेत. यामुळे वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेच्या नियमांची उघडपणे पायमल्ली होत असून, नागरिक आणि प्रवासी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
पत्रीपुलावरील या छायाचित्रात ट्रकच्या मागील बाजूस लोखंडी साखळी आणि मोठा हूक लटकताना दिसतो. हा हूक वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वार अथवा सायकलस्वाराला लागला, तर तो गंभीर जखमी होऊ शकतो. इतकंच नव्हे तर जीवितहानीही संभवते. अशा परिस्थितीतही प्रशासन आणि वाहतूक विभागाने अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने प्रश्न निर्माण झाला आहे. अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
दररोज या पुलावरून हजारो दुचाकीस्वार, पादचारी आणि सायकलस्वार प्रवास करतात. पण पुलावर गस्त नसल्याने वाहतूक नियमांची अंमलबजावणी होत नाही. रात्रीच्या वेळी अवजड वाहनांचा ताफा सरळ या पुलावरून जातो आणि त्यामुळे पुलाचा पाया व संरचनेवर ताण वाढतो. नागरिकांनी याबाबत अनेक वेळा लेखी आणि तोंडी तक्रारी दिल्या आहेत; परंतु प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे पत्रीपूल अपघातांचा केंद्रबिंदू बनेल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
शॉर्टकट म्हणून वापर
सध्याच्या घडीला ठाणे वाहतूक पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गांवर, विशेषतः घोडबंदर रोड आणि शिळफाटा परिसरात अवजड वाहनांवर निर्बंध लादले आहेत. पत्रीपुलासारख्या लोकल जोडरस्त्यांवर मात्र अशा वाहनांसाठी ठोस नियम नाहीत. त्यामुळे ट्रकचालक या मार्गाचा वापर शॉर्टकट म्हणून करीत असल्याचे दिसते. पुलाच्या दोन्ही बाजूला धूळ, खड्डे आणि तुटलेले गार्डल्स असल्याने दुर्घटनेचा धोका संभवतो.
तातडीने लक्ष घालण्याची मागणी
कल्याण महापालिका आणि वाहतूक विभागाने तातडीने लक्ष घालून पत्रीपूल परिसरातील अवजड वाहनांची वाहतूक थांबवावी, अशी मागणी जोर धरीत आहे. सुरक्षिततेसाठी गस्त, प्रतिबंधक फलक आणि तातडीची दुरुस्ती आवश्यक असून, प्रशासनाने या परिस्थितीकडे वेळीच लक्ष न दिल्यास संभाव्य दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच येणार आहे. याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.