राष्ट्रीय स्पर्धेत डोंबविलीकरांचा डंका
तीन स्पर्धकांनी पटकावली आठ पदके
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १८ ः राष्ट्रीय पावरलिफ्टिंग स्पर्धेत डोंबिवलीतील तीन स्पर्धकांनी सुवर्णपदकासह एकूण आठ पदके पटकावली आहेत. वर्ल्ड रॉ पॉवरलिफ्टिंग फेडरेशनच्या पुढाकाराने ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत देशभरातील १३ राज्यांमधील एकूण ३० स्पर्धक सहभागी झाले होते, तर महाराष्ट्रातून २१ स्पर्धक सहभागी झाले होते. यात डोंबिवलीच्या स्पर्धकांचा समावेश होता.
नवी दिल्ली येथे ही स्पर्धा पार पडली असून, बुरारी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजीव झा यांची विशेष उपस्थिती होती. वर्ल्ड रॉ पॉवरलिफ्टिंग फेडरेशनचे सुनील लोचब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत ७६.४ किलो वजनी गटात डोंबिवलीतील समीर जोगळेकर यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील आव्हानात्मक परिस्थितीवर मात करून जोगळेकर यांनी चार सुवर्णपदके पटकावली. उप कनिष्ठ गटात सर्वेश वंजारे यांनी ९० किलो वजनी गटात दोन सुवर्णपदके मिळवली, तर १०५ किलो वजनी गटात अभिराज गिरकर यांनी एक रौप्य आणि एक कांस्यपदक पटकावले. या यशस्वी स्पर्धकांचे डोंबिवलीत आगमन झाल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वागत केले.
कल्याण शहरातील स्पर्धकांमध्ये मास्टर दोन ९० किलो वजनी गटात, शंकर ठाकूर यांनी तीन रौप्य आणि दोन सुवर्णपदके पटकावली. सीनिअर गटात कल्याणच्या गिर्जेश रजक यांनी एक रौप्य आणि तीन सुवर्णपदके मिळवली. ठाणे कळवा येथील अर्चना गोवूळकर यांनी मास्टर दोन गटांत पाच सुवर्णपदके प्राप्त केली. मुंबईतील मुलुंड, भांडुप, कुर्ला येथील स्पर्धकांनीही बाजी मारली.
महाराष्ट्रातील स्पर्धकांचे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी भेट घेऊन स्पर्धकांनी केलेल्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आणि अशाच प्रकारे उत्तरोत्तर यशाचे टप्पे गाठण्याचा सल्ला दिला. या स्पर्धेतून यशस्वी झालेल्या स्पर्धकांमधून रशियातील मॉस्को येथे होणाऱ्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी स्पर्धकांची निवड केली जाणार आहे.
स्ट्रॉग वूमन पुरस्काराच्या मानकरी
महिला वरिष्ठ ७५ किलो वजनी गटात डोंबवलीच्या दीपाली घाग यांनी बाजी मारली. दीपाली घाग यांनी क्लासिक या प्रकारामध्ये दोन सुवर्णपदके पटाकावली आहेत. यासोबतच दीपाली घाग स्ट्रॉग वूमन पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.