मुंबई

थोडक्‍यात बातम्या रायगड

CD

दिवाळी पहाटेला शिवभक्तांच्या जयघोषात उजळला अवचित गड
अलिबाग, ता. २० (वार्ताहर) ः रोहा येथील शिवशंभु प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित ‘दिवाळी पहाट २०२५’ या भव्य उत्सवाचे यावर्षी ११ वे वर्ष उत्साहात पार पडले. पारंपरिक ढोल-ताशा, मशाल यात्रा आणि शिवभक्तांच्या घोषणांनी संपूर्ण अवचित गड परिसर दणाणून गेला. रात्रीपासून पहाटेपर्यंत चाललेल्या या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला परिसरातील शेकडो मावळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल तेलंगे यांच्या उपस्थितीत शिववंदना व स्वागत समारंभाने झाली. प्रस्तावना प्रशांत बर्डे यांनी सादर केली. त्यानंतर अमरदीप म्हात्रे यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन करून उपस्थित मावळ्यांना शिवचरित्राचे स्मरण करून दिले. यानंतर गोंधळ, मशाल यात्रा, आखाडा, भजन-जागरण असा पारंपरिक कार्यक्रम रात्रभर रंगत गेला. पहाटे ४ वाजता महादेव मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. गडावरील महादेवाच्या मंदिर परिसरात एकाचवेळी लावलेल्या हजारो दिव्यांनी परिसर प्रकाशमय झाला आणि उपस्थितांनी ‘जय भवानी जय शिवाजी’चा नारा देत शिवभक्तीचा उत्सव साजरा केला.
.......................
खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते पर्यावरणपूरक पिशवीचे वाटप
रोहा (वार्ताहर) ः दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक शहराचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून रोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष समीर शेडगे यांच्या पुढाकाराने यंदाही मोफत पिशवी व दिवे वाटप करण्यात आले. सुतारवाडी येथील गीताबाग कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. ‘स्वच्छ रोहा – सुंदर रोहा’ या संकल्पनेतून शहरातील आणि अष्टमी गावातील नागरिकांना पर्यावरणपूरक पिशव्या देऊन प्लॅस्टिकमुक्त शहराचा संदेश देण्यात आला. या निमित्ताने समीर शेडगे आणि वनश्री शेडगे बाप-लेक जोडीने सामाजिक उत्तरदायित्वाचे दर्शन घडवले. प्रत्येक घरापर्यंत पोहोचवलेल्या पिशव्यांमुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता वाढेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. शेडगे परिवार सामाजिक व लोककल्याणकारी उपक्रम राबवित असल्याने स्थानिकांमधून त्यांचे कौतुक होत आहे.
................
वडखळ हद्दीत अवैध मटका जुगारावर पोलिसांची कारवाई
पेण (वार्ताहर) ः वडखळ पोलिस ठाण्याच्या पथकाने अवैध मटका जुगार चालविणाऱ्या ठिकाणी केलेल्या छाप्यात एकाला अटक केली असून जुगारातील साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे स्थानिक परिसरातील अवैध धंद्यांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वडखळ एसटी स्टँडच्या मागील भागात सार्वजनिक शौचालयाजवळ मटका जुगार सुरू असल्याचे आढळले. त्यानुसार पोलिसांनी रात्री १०. ४८ वाजता धाड टाकली. या कारवाईत चंद्रभूषण जितेंद्र सिंह (वय ३५, रा. बोरीफाटा, वडखळ) यास रंगेहात पकडण्यात आले. आरोपीकडून १६३० रुपये रोख, वहीतील नोंदी आणि मटका जुगाराशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास वडखळ पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना अवैध मटका, सट्टा व जुगार यांसारख्या गैरकृत्यांविरोधात माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून वडखळ परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सातत्यपूर्ण पावले उचलली जावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
.......................
चौक नवीन वसाहत येथे मोफत आरोग्य शिबिर
खालापूर (वार्ताहर) ः ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने थर्ड प्लॅनेट फाउंडेशन तर्फे चौक नवीन वसाहत येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराच्या आयोजनात ग्रामपंचायत सदस्या नयना झिंगे यांनी पुढाकार घेतला. एकूण ११६ ग्रामस्थांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. शिबिरात रक्तदाब, साखर, हिमोग्लोबिन, छातीचा एक्स-रे, तसेच मुलांसाठी सामान्य आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर औषधोपचारही मोफत देण्यात आले. ऋतूमान बदलामुळे वाढणाऱ्या आजारांचा धोका लक्षात घेता वेळेवर आरोग्य तपासणी करून घेतल्यास गंभीर आजार टाळता येतात, या उद्देशाने शिबिर राबविण्यात आल्याचे झिंगे यांनी सांगितले. शिबिरादरम्यान वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी आरोग्य विषयक जनजागृती केली. उपस्थित ग्रामस्थांनी फाउंडेशन व ग्रामपंचायतीचे आभार मानले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता वाढत असल्याचे मत नयना झिंगे यांनी व्यक्त केले.
..................
आदर्श ग्रामसेवक अभिजित माने यांचा रानवली ग्रामपंचायतीकडून सत्कार
श्रीवर्धन (वार्ताहर) ः रायगड जिल्हा परिषदेकडून ‘आदर्श ग्रामसेवक’ पुरस्काराने सन्मानित अभिजित माने यांचा रानवली ग्रामपंचायतीकडून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माने यांनी हा पुरस्कार माझ्या कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या सहकार्यामुळे मिळाला असून हे यश सर्व ग्रामस्थांचे आहे, असे सांगितले. त्यांनी कारीवणे, गाणी, रानवली आणि साखरोणे या गावांतील जनतेचे आभार मानले. सत्कार सोहळ्यात सरपंच सुरेश मांडवकर, उपसरपंच अताउल्ला जालगावकर, सदस्य समीर पोफलणकर, भावीका जोशी, शितल धामणकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडवकर यांनी तर सूत्रसंचालन भिकू पांगारकर यांनी केले. या प्रसंगी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मानसी माळवदे यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमानंतर ग्रामपंचायतीतर्फे दिवाळी फराळाचे आयोजन झाले. माने यांनी यापूर्वी काम केलेल्या हरेश्वर ग्रामपंचायतीतील नागरिकांचे सहकार्य देखील प्रेरणादायी ठरल्याचे सांगितले. मी या पुढेही गावांच्या विकासासाठी पूर्ण निष्ठेने कार्य करीन, असे त्यांनी आश्वासन दिले.
...............
शिक्षक सुनील गोरेगावकर यांना रायगड जिल्हा शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार
माणगाव (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध शिक्षक सुनील द्रौपदी धर्मा गोरेगावकर यांना २०२२ ते २०२६ या कालावधीसाठी ‘रायगड जिल्हा शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाला असून त्यांचा गौरव अलिबाग येथे झालेल्या भव्य समारंभात करण्यात आला. या कार्यक्रमास मंत्री भरत गोगावले, आदिती तटकरे आणि आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. १९९८ रोजी पहेल गावात शिक्षक म्हणून रुजू झालेले गोरेगावकर यांनी तब्बल २७ वर्षांची यशस्वी सेवा दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो विद्यार्थी शिक्षण, क्रीडा व कलाक्षेत्रात झळकले. २०१० रोजी ते रायगड जिल्हा खो-खो संघाचे प्रशिक्षक बनले आणि प्राथमिक शिक्षक म्हणून ही भूमिका पार पाडणारे पहिले प्रशिक्षक ठरले. त्यांच्या विद्यार्थिनी सुनाक्षी चेरफळे आणि तृप्ती पालकर या ‘उत्कृष्ट खेळाडू’ पुरस्काराने सन्मानित झाल्या. क्रीडा प्रबोधिनी माणगाव तालुका समन्वयक म्हणून त्यांनी सात विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत पात्र केले. २०२४ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी भारत बास्टेवाड यांच्या हस्ते त्यांना विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्यामुळे माणगाव तालुका शिक्षण क्षेत्रात एक आदर्श प्रस्थापित झाला आहे.
.................
पेणमध्ये आगरी समाजाचे आंदोलन जाहीर
पेण (वार्ताहर) ः बॅरिस्टर ए. टी. पाटील चौक उध्वस्त करून त्याजागी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या निर्णयाविरोधात आगरी समाजाने आंदोलनाची चेतावणी दिली आहे.
२०१५ रोजी पेण नगरपालिकेने उभारलेला बॅरिस्टर ए. टी. पाटील चौक आता पाडून त्या ठिकाणी नवीन पुतळा उभारला जात आहे. महाराजांच्या पुतळ्यास विरोध नाही, मात्र आगरी समाजाच्या नेत्याची अस्मिता पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे माजी जि. प. सभापती संजय जांभळे यांनी बैठकीत सांगितले. महात्मा गांधी सभागृहात झालेल्या बैठकीस डॉ. सिद्धार्थ पाटील, अशोक मोकल, नंदा म्हात्रे, आर.जे. म्हात्रे, निवृत्त न्यायाधीश पी.डी. म्हात्रे यांसह अनेक समाज नेते उपस्थित होते. सिद्धार्थ पाटील यांनी सांगितले की, शासनाच्या नियमानुसार दोन पुतळ्यांमध्ये किमान दोन किलोमीटर अंतर ठेवणे आवश्यक आहे. परंतु नगरपालिका या नियमाचे उल्लंघन करून पुतळा उभारत आहे. त्यामुळे समाज एकवटून २५ ऑक्टोबर रोजी आंदोलन करणार आहे. या संदर्भात पेण पोलिसांना निवेदन देण्यात आले असून प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आगरी समाजाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RJD Candidate Arrested : उमेदवारी अर्ज दाखल करताच 'राजद'च्या उमेदवारास झारखंड पोलिसांनी केली अटक!

Deglur Accident : बस व ट्रॅव्हल्स समोरासमोर अपघात २८ जण गंभीर जखमी, लेंडी पुला जवळील घटना; २ तास वाहतूक खोळंबंली

'२०२७ वनडे वर्ल्ड कप जिंकायचा असेल, तर आगरकर - गंभीरला पदावरून हटवा!', Navjot Singh Sidhu खरंच असं म्हणाले? स्वत:च केला खुलासा

Diwali Celebration : ऑपरेशन पहाट; सोलापूर पोलिसांनी पारधी कुटुंबांसोबत साजरी केली दीपावली, शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Actor Asrani Passes Away : ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन, ८४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT