कल्याण अवती-भवती
शेतकऱ्यांना मदतीसाठी तहसीलदारांना निवेदन
कल्याण : (वार्ताहर) : अतिवृष्टी आणि पुराच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या वेदनांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले असून, सरकारच्या खोट्या आश्वासनांमुळे व धोरणांमुळे यंदाची दिवाळी बळीराजासाठी दुःखद आणि काळी ठरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी, त्यांच्या न्यायासाठी आणि शासनाच्या उदासीनतेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) च्या कल्याण-डोंबिवली जिल्हा शाखेने कल्याण तहसीलदारांना निवेदन दिले.या वेळी राष्ट्रवादी विमुक्त भटक्या जमाती सेलचे जिल्हा अध्यक्ष दिनेश परदेशी, राष्ट्रवादी संघटक सचिव वल्ली राजन आणि सामाजिक कार्यकर्ता तोशेस शुक्ला उपस्थित होते. राज्यात अतिवृष्टीमुळे चौफेर नुकसान झाले असून, कधी नव्हे असे नैसर्गिक संकट आल्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. राष्ट्रवादीने मागणी केली की, सरकारने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये, जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना किमान चार लाख ५० हजार रुपये प्रति हेक्टरी, विहिरीमध्ये गाळ गेलेल्या शेतकऱ्यांना किमान एक लाख ५० हजार रुपये मदत करावी. तसेच जनावरे (गाय, म्हैस व बैल) साठी किमान एक लाख रुपये मदत देऊन शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून विद्यार्थ्यांची शालेय फी माफ करावी आणि पीक विम्याच्या पैशाचे वितरण कंपनीकडून व्यवस्थित व्हावे. राज्यातील बळीराजाला सरकारने सढळ हस्ते मदत करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
.........................................
गृहसंकुलांना बाकडे भेट
कल्याण (वार्ताहर) : दिवाळीतील धनतेरस या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून कल्याण पश्चिमचे शिवसेना (शिंदे समर्थक) आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून आणि युवासेना उपशहरप्रमुख मेघन सल्पी यांच्या प्रयत्नाने चार गृहसंकुलांना बसण्यासाठी बाकडे देण्यात आले. पॅनेल क्रमांक ८ कृषी बाजार समिती येथील आदेश्वर पार्क, देवआशिष, देवदर्शन आणि आशिया अल्टीस या सोसायट्यांनी केलेल्या मागणीनुसार त्यांना ही बाकडे भेट देण्यात आली. गृहसंकुलांना बाकडे मिळाल्याने येथील नागरिकांना विरंगुळा मिळण्यास मदत मिळणार आहे. या वेळी सोसायटीतील रहिवासी, तसेच शिवसेना, भाजप पक्षाचे कार्यकर्ते आणि ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाकडे भेट दिल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांनी आमदार विश्वनाथ भोईर आणि युवासेना उपशहर प्रमुख मेघन सल्पी यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी भाजप कायदा आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲड. समृद्ध ताडमारे, बैलबाजार वॉर्ड अध्यक्ष भावेश ढोलकिया, आर्किटेक्ट नयन ढोलकीया, भाजपा दिव्यांग आघाडी संयोजक मिलिंद मेहता, रामचंद्र बाबडे, संकेत बाबडे, संजय लोखंडे, किशोर तिवरे, विनायक पवार, कैलास चौधरी, सागर गुडदे, रघुनाथ भोई, भावना गोसर आदी सोसायटी कमिटी सदस्य, शिवसेना-भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
.....................................
अचिव्हर्स कॉलेजतर्फे जिल्हा परिषद शाळा मानिवली येथे फराळवाटप
डोंबिवली (बातमीदार) : अचिव्हर्स कॉलेज ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, कल्याण यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा मानिवली येथे दिवाळीनिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ किटचे वाटप करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी दिवाळी सणानिमित्त वेगवेगळ्या थीमवर आधारित किल्ले बनवून शालेय आवार सुंदर सजवले होते. या किल्ला स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात सी.ए. महेश भिवंडीकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीचा सण आनंदाने आणि सुरक्षिततेने साजरा करा, असा संदेश दिला. कार्यक्रमानंतर आदिवासी वाडीतील प्रत्येक कुटुंबाला धान्य आणि फराळ किटचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांना आपल्या मुलांना नियमितपणे शाळेत पाठवण्याचे आवाहन केले. याप्रसंगी रेखा भिवंडीकर, सोफिया डिसुझा, प्रफुल्ल नारायण मॅडम, राजेश यादव, रोहन गुप्ता, चंद्रकला घनश्याम गायकर (सरपंच), ज्योतीताई गायकर, हिराबाई गायकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू चौधरी यांनी केले, तर शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक विजय प्रगणे आणि वर्गशिक्षक स्नेहल भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
............................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.