नवेदर बेली येथील पुलाची दुरवस्था
धोकादायक जाहीर करूनही अवजड वाहतूक सुरूच
अलिबाग, ता. २६ (वार्ताहर) ः अलिबाग-रेवदंडा मार्गावरील नवेदर बेली येथील पुलाची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे या पुलावरून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तत्काळ बंदी घालणारा आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी ऑगस्ट महिन्यात जारी केला होता, मात्र आजही त्या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे.
अलिबाग-रोहा, अलिबाग-रेवदंडा, पोयनाड-उसर-भादाणे व भाकरवड-देहेन या मार्गावरील एकूण आठ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले होते. त्यामध्ये नवेदर बेली पुलाचादेखील समावेश आहे. हे पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिका-यांनी संबंधित पुलांवरून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तत्काळ बंदी घालणारा आदेश ऑगस्ट महिन्यात जारी केला होता, मात्र बंदीचे आदेश झुगारून अलिबाग-रेवदंडा मार्गावरील नवेदर बेली येथील पुलावरून अनेक अवजड वाहने धावताना दिसत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून होत असलेल्या खासगी अवजड वाहनांना रोखणार कधी, असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे.
या पुलाचा खालील भाग खचला असून, सिमेंट निघालेले आहे. अनेक भागांना तडे गेले आहेत. पुलाच्या लोखंडी सळ्यादेखील बाहेर आल्या आहेत. त्यांना गंज लागलेला आहे. त्यामुळे हा पूल अखेरची घटका मोजत असल्याचे चित्र आहे. या पुलाच्या दुरुस्तीकडे अद्यापपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लक्ष देण्यात आले नाही. पाऊस संपून अनेक दिवस उलटून गेले आहेत, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलाबाबत बघ्याची भूमिकाच घेतली जात आहे.
..................
प्रतिक्रिया :
धोकादायक पुलांची नव्याने उभारणी करण्यात येणार आहे. या कामाची निविदा काढण्यात आली असून, लवकर त्याचे काम सुरू करण्यात येईल.
- मोनिका धायतडक, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग