कौटुंबिक वादातून वयोवृद्धाचा खून
दुसऱ्या पत्नीसह दोन सावत्र मुले जेरबंद; ग्रामीण पोलिसांना खुनाचे गूढ उलगडण्यात यश
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : नशेच्या आहारी गेलेल्या एका वयोवृद्धाची कौटुंबिक वादातून गळा आवळून हत्या केल्याचे गूढ उकलण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी त्या वृद्धाच्या दुसऱ्या पत्नीसह दोन सावत्र मुलांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्या तिघांना सोमवारपर्यंत (ता. २७) पोलिस कोठडी मिळाली आहे, अशी माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांनी दिली.
मुरबाड गावाच्या अहिल्यानगर कल्याण राष्ट्रीय महामार्गवर ६ ऑक्टोबर रोजी एका ६० वर्षीय वयोवृद्धचा मृतदेह आढळून आला. त्याचा खून हा गळा आवळून करण्यात आला होता. याप्रकरणी टोकावडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर ग्रामीण पोलिसांसमोर वृद्धाची ओळख पटवण्याचे पहिले आव्हान उभे होते. त्यामुळे ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याचे आदेश दिले. तो गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वेगवेगळे पथके तयार करण्यात आली. त्या पथकांनी आजूबाजूच्या परिसरातील सर्व सीसीटीव्हीची, महाराष्ट्रात व इतरत्र दाखल मिसिंगची पडताळणी केली. संशयित वाहनांची कसून तपासणी केल्यावरही मयताबाबत कोणतीही उपयुक्त माहिती हाती लागत नव्हती. त्यामुळे ओळख पटविणे हे कठीण झाले होते. त्यातच गुन्ह्यांचा कुठलाही धागादोरा हाती नसताना स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश कदम व त्यांच्या पथकाला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वृद्ध हे कल्याण काटेमानिवली येथे राहणारे असून, त्याचे नाव राजेश ठक्कर (६०) असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी टेम्पोचालक असलेल्या नवीद सैय्यद (२८) या मुलाला ताब्यात घेतले. त्याने चौकशीत त्याची आई तथा राजेश ठक्कर यांची दुसरी पत्नी आशा सैय्यद (५५) आणि दुसरा मुलगा नाझीम सैय्यद (२६) यांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली.
नशेत कुटुंबाला त्रास
राजेश ठक्कर हे नशेच्या आहारी गेले होते. नशेत ते कुटुंबाला त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून खून झाल्याचे तपासात समोर आले. त्या तिघांना पकडून स्थानिक गुन्हे शाखेने टोकावडे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, २७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास टोकावडे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संजीव साखरे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.