७३व्या वर्षी डोंबिवलीकर विद्याधर भुस्कुटे यांची पदयात्रा
डोंबिवली, ता. २९ बातमीदार ः डोंबिवलीकर विद्याधर भुस्कुटे यांच्या ऐतिहासिक पदयात्रेची शुक्रवारी (ता. ३१) सुरुवात होणार आहे. वयाच्या ७३व्या वर्षी ‘चालू या महाराष्ट्र’ या माध्यमातून पदयात्रेत ते पर्यावरण जागृतीचा महत्त्वाचा संदेश देणार आहे. विद्याधर भुस्कुटे हे एकूण तीन हजार २१५ किमी पायी प्रवास करणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांतून ते भ्रमंती करीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
डोंबिवली येथून या पदयात्रेला विद्याधर भुस्कुटे सुरुवात करणार आहेत. तब्बल २७ जिल्हे ही पदयात्रा करणार आहेत. या पदयात्रेचे आरोहण या संस्थेने नियोजन केले आहे. समाजात, देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात शांती, मानवता, कन्या भ्रूणहत्याविरोध, मूल्याधिष्ठित शिक्षणव्यवस्था आणि पर्यावरण संरक्षण या विषयांबाबत जनजागृती करणे हे या पदयात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे. २१व्या शतकातील खरा देशभक्त कसा असावा, या प्रश्नाचा विचार करीत असताना त्यांना जाणवले, की या विषयांबाबत जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी ते अखंड भारताचा कानाकोपरा पायी चाललेले आहेत. या मुद्द्यावर एकूण २० राज्ये फिरून विविध वयोगटांतील आणि समाजातील विविध श्रेणींमधल्या लोकांशी जनसंपर्क साधून त्यांनी हा विचार समाजाला दिला. आता त्यांना खोलवर जाऊन महाराष्ट्राच्या जिल्ह्यांना अनुभवायचे आहे. पर्यावरण असंतुलनाचे परिणाम गेल्या काही वर्षांत जाणवू लागली आहेत. जागरूक नागरिक म्हणून पर्यावरण रक्षणाच्या व संवर्धनाच्या दृष्टीने काही ठोस पावले उचलणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी पदयात्रेच्या माध्यमातून पर्यावरण जागृती करण्यात येणार आहे.
१२ वर्षांत भारतभर तीन पदयात्रा
भुस्कुटे यांनी १२ वर्षांत तीन पदयात्रा केल्या आहेत. यामध्ये त्यांनी पहिली पदयात्रा काश्मीर ते कन्याकुमारी-उत्तर ते दक्षिण भारताचा अखंड प्रवास (चार हजार किमी), दुसरी पदयात्रा किबिथू (अरुणाचल प्रदेश) ते पोरबंदर (गुजरात) पूर्व ते पश्चिम प्रवास (चार हजार किमी), तिसरी पदयात्रा साबरमती आश्रम, अहमदाबाद ते शांतिनिकेतन, कोलकाता ही भारताच्या संपूर्ण किनारपट्टी मार्गाने विवेकानंद रॉक मेमोरियल, तमिळनाडूमार्गे (चार हजार, ७५२ किमी) प्रवास केला आहे. आता ते पुन्हा एकदा नवीन ध्येय समोर ठेवत मार्गस्थ होणार आहेत.
असा असणार प्रवास...
या पदयात्रेची सुरुवात डोंबिवलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून करण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. ३१) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून या पदयात्रेची सुरुवात होणार आहे. त्यामध्ये पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशीम, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव-उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड असे पायी चालून डोंबिवलीमध्ये परतणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.