ऑक्सिजन पाइपलाइनसाठी निविदाच नाही
कळवा रुग्णालय प्रशासनाचा भाेंगळ कारभार; नूतनीकरण लांबणार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ ः गर्भवतींसाठी पुरेसे बेडच उपलब्ध नसल्याचे प्रकरण ताजे असतानाच ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील आणखी एक भाेंगळ कारभार उघड झाला आहे. नूतनीकरणादरम्यान रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या पाइपलाइनसाठी निविदाच काढण्यात आली नसल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी मंजूर करूनही दाेन महिने झाले तरी निविदा प्रक्रिया राबवली नसल्याने नूतनीकरणाचे काम दाेन वर्षांपर्यंत लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्य सरकारच्या काेट्यवधींच्या निधीतून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी आहे. या रुग्णालयात दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधीही देण्यात येताे; मात्र रुग्णालय प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे पालिका प्रशासनाला टीकेचे धनी व्हावे लागत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या खूप माेठी आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रुग्णालयाचे नूतनीकरण करून बेडची संख्या वाढविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्यासाठी पहिल्या टप्प्यात रुग्णालयाच्या कामासाठी ६० कोटींचा निधी मिळाला आहे, तर उर्वरित ७५ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. तो निधीदेखील लवकरच मिळणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात उपलब्ध झालेल्या निधीतून फेब्रुवारीपासून रुग्णालयातील नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यात बेडची क्षमता ही ५०० वरून ८४० एवढी होणार आहे. एका वॉर्डचे नूतनीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात आले; पण हे काम पूर्ण झाल्यानंतर तेथे ऑक्सिजन लाइनच टाकली नसल्याची बाब काम पूर्ण झाल्यावर रुग्णालय प्रशासनाच्या निर्दशनास आली. त्यानंतर दिवाळीपूर्वी एका ठेकेदाराकडून या वॉर्डमध्ये ऑक्सिजन लाइन टाकण्यात आल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.
रुग्णालयाचे विभाग
वॉर्ड : १८
शस्त्रक्रिया विभाग : ८
अतिदक्षता विभाग : १
बालरुग्ण कक्ष : १
-----
नूतनीकरणासाठी निधी
६० काेटी
पहिल्या टप्प्यात निधी
----
७५ काेटी
उर्वरित निधी मंजूर
-----
पाइपलाइनसाठी पाच काेटींचा निधी
ऑक्सिजन पाइपलाइन टाकण्यासाठी नव्याने निविदा काढावी लागणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने रुग्णालय प्रशासनाला सांगितले. त्यानुसार या खर्चाचा अंदाज मागवून पाच कोटी मंजूर करण्यात आले. निधी मंजूर होऊन दोन महिने उलटले तरी रुग्णालय प्रशासनातील अधिकाऱ्यांना निविदा काढण्यासाठी वेळच मिळाला नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
......................................
दाेन वर्षे रखडणार
रुग्णालय प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविली नसल्याने आता नूतनीकरणाच्या कामालाही ब्रेक लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या कामाचा कालावधी एका वर्षाहून दोन वर्षांवर जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीचा फटका नूतनीकरणाच्या कामाला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
----
ऑक्सिजन पाइपलाइनच्या कामासंदर्भातील निविदा प्रक्रिया सुरू आहे. ती लवकरच पूर्ण केली जाईल. त्यानंतर सर्व कामे वेळेतच पूर्ण होतील.
- डॉ. अनिरुद्ध माळगावकर, वैद्यकीय अधीक्षक, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.