तारासिंग राठोड यांचा सन्मानपूर्वक सेवानिवृत्त समारंभ
रोहा (बातमीदार) ः कोलाड वीज महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ तारासिंग मोतीराम राठोड यांनी २४ वर्षांची प्रामाणिक सेवा पूर्ण करून सेवानिवृत्ती घेतली. त्यांच्या निरोप समारंभास खासदार सुनील तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते. राठोड यांनी सेवाकाळात जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडून सहकाऱ्यांमध्ये सुसंवाद राखला. त्यांच्या सन्मानार्थ कार्यालयाने आयोजित कार्यक्रमात त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
२. स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेत मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण
अलिबाग वार्ताहर ः बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे ३५ दिवसीय मोफत निवासी ब्युटी पार्लर प्रशिक्षण १० नोव्हेंबरपासून पंतनगर, अलिबाग येथे सुरू होत आहे. या प्रशिक्षणात बेसिक ते ॲडव्हान्स तंत्रज्ञान, मार्केटिंग, संवाद कौशल्य आणि बँक योजनांबाबत मार्गदर्शन दिले जाईल. प्रशिक्षणार्थींसाठी भोजन व निवास मोफत असून, यशस्वी उमेदवारांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
३. लाइट ऑफ लाइफ ट्रस्टतर्फे पालक प्रतिनिधी प्रशिक्षण
अलिबाग वार्ताहर ः लाइट ऑफ लाइफ ट्रस्टने रेवदंडा येथे पालक प्रतिनिधी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. बोर्ली, वळके, रामराज व बेलोशी केंद्रांतील ४४ पालक प्रतिनिधींनी सहभाग घेतला. शिबिरात पालक प्रतिनिधींची जबाबदारी, नियोजन व सहभागाचे महत्त्व समजावण्यात आले. संस्थेच्या अनुजा राऊळ व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वी झाला.
४. माणगावात शिवसेनेत राष्ट्रवादीसह इतर पक्षांचा प्रवेश
माणगाव वार्ताहर ः साई मोहल्ला, सुर्ले, पवारवाडी, डोंगरोलीसह विविध भागातील राष्ट्रवादी व इतर पक्षांचे कार्यकर्ते मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल झाले. विकासकामांमुळे शिवसेनेबद्दल वाढता विश्वास दिसून येत असून, नव्या कार्यकर्त्यांचे शिवबंधन बांधून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनेक कार्यकर्त्यांचा शिवबंधन बांधून सन्मानपूर्वक पक्षप्रवेश करण्यात आला. या वेळी साई मोहल्ला व साई कोंड येथील नव्याने शिवसेनेत प्रवेश केलेले कार्यकर्ते दीपेश जंगम, अब्दुल्ला सोलकर, रिहान खेडकर, जुनेद खेडकर, सलमान रहाटविलकर, फरिद सोलकर, उमेद जुवळे, संकेत अडखळे, मेहमूद दळवी आदींचा समावेश आहे.
५. रायगड एसटी विभाग क्रिकेट संघ निवड शिबिर पोयनाड येथे
पोयनाड (बातमीदार) ः पोयनाड येथील झुंजार युवक मंडळाच्या मैदानावर नुकतीच एसटी महामंडळाच्या रायगड विभागाच्या क्रिकेट संघाच्या निवड चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन एसटी महामंडळाच्या रायगड विभागाचे विभाग नियंत्रक सुहास चौरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी एसटी महामंडळाच्या रायगड विभागाचे कामगार अधिकारी सुहास कांबळे, रायगड विभागीय कार्यशाळेचे प्रभारक रवींद्र तांडेल, रायगड विभाग पेण कार्यालयाचे लिपिक रुपेश चांदोरकर, वाहन परीक्षक दिलीप पालवणकर, झुंजार युवक मंडळ पोयनाडचे सचिव किशोर तावडे, क्रीडाप्रमुख नंदकिशोर चवरकर यांच्यासह एसटी महामंडळाच्या रायगड विभागातून ४० खेळाडू या निवड चाचणी शिबिरासाठी उपस्थित होते. पोयनाड येथील झुंजार क्रिकेट मैदानावर झालेल्या या निवड चाचणी शिबिरातून रायगड जिल्ह्याचा क्रिकेट संघ निवडला जाणार असून, हा निवड झालेला संघ एसटी महामंडळाच्या आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी १८ नोव्हेंबरपासून जळगाव येथे सहभागी होणार आहे. या निवड झालेल्या संघाला विभाग नियंत्रक सुहास चौरे यांच्यासह सर्व अधिकारीवर्ग आणि कर्मचारी यांनी आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
६. वकिलांचा लालफिती लावून निषेध
अलिबाग ः जिल्हा न्यायालय, अलिबाग येथे सोमवारी (ता. ३) वकिलांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लाल फिती लावून शांततेत निषेध नोंदवला. बार कौन्सिल ऑफ इंडिया आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या आवाहनानुसार हा निषेध आयोजित करण्यात आला होता. या आंदोलनात रायगड जिल्ह्यातील विविध न्यायालयांतील वकिलांनी सहभाग नोंदवला. वकिलांनी नियमित न्यायालयीन कामकाज पार पाडत असतानाच लाल फिती लावून शासनाने अॅडव्होकेट्स प्रोटेक्शन अॅक्ट तातडीने मंजूर करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी व शेवगाव येथील वकिलांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेधही करण्यात आला. अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील यांनी सांगितले की, आम्ही लाल फिती लावून शांततेत निषेध नोंदवला आहे. आमच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे. या निषेधामुळे न्यायालयीन कामकाज मात्र सुरळीत सुरू राहिले.
७. जयंत पाटील यांची गांगल कुटुंबीयांना सांत्वनपर भेट
रोहा (बामीदार) ः रोहे शहरातील सेवानिवृत्त शिक्षिका विजया विनायक गांगल यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी ३१ ऑक्टॉबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. पतीच्या निधनानंतर त्यांनी सातवीमध्ये प्रवेश घेऊन रोहा येथे इ. ११ वी पर्यंत माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. नंतर पुण्यात डी. एडपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी रोहे येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत शिक्षिका म्हणून सेवा बजावली. त्यांच्या पश्चात मुलगा संजय, मुलगी साधना त्यांचे पुतणे ॲड. संजय गांगल असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला रोहे शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोमवारी शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील, सुप्रिया जयंत पाटील, आरडीसी बॅंकचे संचालक गणेश मढवी आदी मंडळींनी गांगल कुटुंबीयांना सांत्वनपर भेट दिली.
.................
८. रोहा येथे ३९ रुग्णांना मिळाली नवी दृष्टी
रोहा (बातमीदार रोहा सिटीझन फोरम व आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलतर्फे नेत्रतपासणी शिबिरात ८१ रुग्णांची तपासणी झाली. त्यापैकी ३९ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या तीन वर्षांत ३५०० हून अधिक रुग्णांना नवी दृष्टी मिळाली असून, फोरम सदस्यांनी शिबिर यशस्वी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.