बेलापूर न्यायालयातील वकिलांनी लाल फिती बांधून नोंदविला संताप
नवी मुंबईा, ता. ४ (वार्ताहर) : अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात वकिलावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने राज्यभरातील वकील वर्गात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध आणि वकिलांच्या आत्मसन्मान व सुरक्षेचा प्रश्न अधोरेखित करण्यासाठी नवी मुंबईतील बेलापूर न्यायालयातील वकिलांनी सोमवार, ता. ३ नोव्हेंबर रोजी लाल फिती बांधून निषेध आंदोलन केले.
अहिल्यानगरमध्ये न्यायालयीन सुनावणीदरम्यान एका वकिलाने उलटतपासणी करताना विचारलेल्या प्रश्नावरून आरोपी संतापला आणि त्याने वकिलावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेनंतर संपूर्ण राज्यातील वकील वर्गात संताप पसरला असून, न्यायव्यवस्थेतील कायदा रक्षकच असुरक्षित असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर वकील परिषद महाराष्ट्र आणि गोवा यांनी २९ ऑक्टोबर रोजी सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव पारित करून हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्या निर्णयाला पाठिंबा देत बेलापूर न्यायालयातील सर्व वकिलांनी सोमवार रोजी लाल फिती बांधून शांततापूर्ण निषेध नोंदविला. या आंदोलनाचे नेतृत्व बेलापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. सुनील मोकल आणि उपाध्यक्ष ॲड. संदीप रामकर यांनी केले. यावेळी संघटनेचे इतर पदाधिकारी, तसेच शेकडो वकिल उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने हल्ल्याचा निषेध व्यक्त करत दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली. वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता गंभीर बनला असून, गेल्या काही महिन्यांत राज्यात वकीलांवरील हल्ल्यांच्या घटनांत वाढ झाली आहे. न्यायालयीन कामकाज करताना वकील सुरक्षित नसतील, तर न्यायप्रक्रियेवर परिणाम होईल, अशी भीती वकिलांनी व्यक्त केली. शासनाने वकील वर्गाच्या सुरक्षेसाठी तात्काळ ठोस पावले उचलावीत, तसेच ‘वकील संरक्षण कायदा’ तातडीने लागू करावा, अशीही मागणी आंदोलनात करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.