वादळानंतर जागा झाला मत्स्यव्यवसाय विभाग!
उरण, ता. ४ (वार्ताहर) : चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक मच्छीमार बोटींचे मोठे नुकसान झाले. काही बोटींचा संपर्क तुटला, तर काही दिवसानुदिवस बेपत्ता राहिल्या. या गंभीर घटनेनंतर अखेर मत्स्यव्यवसाय विभाग जागा झाला असून रविवारी करंजा-उरण येथे जनजागृती कार्यक्रम घेऊन मच्छीमारांना सुरक्षा उपायांचे धडे दिले. मात्र मच्छीमारांच्या मते, ही कृती “वराती मागून घोडे” अशी ठरली आहे.
वादळाच्या काळात विभागाने कोणतीही तातडीची यंत्रणा कार्यान्वित केली नव्हती, असा आरोप मच्छीमार संघटनांनी केला आहे. ट्रान्सपॉन्डर, व्हीटीएस, व्हीएचएफ यंत्रणा बंद असल्याने अनेक बोटी अडचणीत सापडल्या. विभागाने जर या साधनांच्या वापरासंबंधी पूर्वीच सक्ती आणि प्रशिक्षण दिले असते, तर अनेक जीवितहानी टळली असती, असे मत मत्स्य व्यवसायिक व्यक्त करतात. मत्स्यव्यवसाय विभागाची जनजागृती मोहीम वादळानंतर घेण्याऐवजी बंदी काळात राबविली असती, तर ती अधिक परिणामकारक ठरली असती, अशी मच्छीमारांची नाराजी आहे. त्यांच्या मते, सध्या अधिकारी केवळ कार्यक्रम घेऊन दिखावा करत आहेत, पण सुसज्ज नियंत्रण कक्ष, तत्पर संपर्क यंत्रणा आणि बचाव पथकांची व्यवस्था मात्र अद्याप अस्तित्वात नाही. या बैठकीत सहआयुक्त युवराज चौगुले यांनी मच्छीमारांना सुरक्षिततेसाठी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्याचे आवाहन केले. मात्र, मच्छीमार संघटनांचे म्हणणे आहे की, विभागाची ही आवाहने केवळ कागदावरच मर्यादित राहिली आहेत. प्रत्यक्षात समुद्रात उतरणाऱ्या खलाशांना कोणतीही ठोस सुरक्षा मदत मिळत नाही.
..................
एलईडी मासेमारीला परवानगी द्या
सध्या महाराष्ट्रातील अंदाजे १२०० ते १५०० बोटी पर्ससीन नेट मासेमारी करत आहेत, तर ७५० हून अधिक बोटी एलईडी लाईटचा वापर करतात. बाहेरील राज्यांच्या बोटीही या पद्धतीने महाराष्ट्राच्या सीमेत येऊन मासेमारी करतात. मग स्थानिक मच्छीमारांनी तसे केल्यास दोष का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे एलईडी मासेमारीला अधिकृत परवानगी द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. महाराष्ट्र प्रदेश फिशरमन काँग्रेसचे अध्यक्ष मार्टंड नाखवा यांनी सांगितले की, जनजागृती शिबिर बंदी काळात घेणे आवश्यक होते. अधिकारी वर्गाकडे मत्स्य अभ्यासाचे शिक्षण नसताना ते खलाशांना मार्गदर्शन कसे करणार? एलईडी मासेमारीचा मुद्दा राज्य आणि केंद्र शासनाकडे तातडीने मांडावा, म्हणजे मच्छीमारांना न्याय मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.