घोड्यांच्या निवाऱ्यावर टांगती तलवार
माथेरानच्या अश्वपालकांमध्ये संतापाचे वातावरण
कर्जत, ता. ४ (बातमीदार) : महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरान येथील घोड्यांच्या निवाऱ्यावर प्रशासनाकडून ३० ऑक्टोबर रोजी सकाळी अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू झाली, मात्र तणावाची स्थिती पाहून कारवाई तूर्तास थांबविण्यात आलेली आहे.
दस्तुरी नाका परिसरातील भूखंड क्रमांक ९३ हा महसूल विभागाने नगर परिषदेला पार्किंगसाठी दिल्यानंतर त्यावर अनेक वर्षांपासून घोडेमालकांनी स्वतःच्या खर्चाने उभारलेली साधी प्लॅस्टिक शेड अनधिकृत ठरवून, ३० ऑक्टोबर रोजी मोठ्या पोलिस बंदोबस्तात हटवण्याची कारवाई सुरू झाली. कारवाईमुळे सुमारे ४०० घोडे बेघर झाले आहेत. पावसाचे वातावरण अजूनही असल्याने घोडे उघड्या आकाशाखाली आहेत. ‘नो व्हेईकल झोन’ असलेल्या माथेरानमध्ये पर्यटकांची वाहतूक आणि जीवनावश्यक वस्तूंची मालवाहतूक घोड्यांवरच अवलंबून असल्याने अनेक वर्षांपासून या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अश्वपालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. माथेरानची संपूर्ण पर्यटन व्यवस्था घोड्यांवर उभी असून, घोडे नसतील, तर येथील पर्यटन ठप्प होईल, अशी भीतीही व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे कारवाई तूर्तास थांबवण्यात आली आहे.
नगर परिषद मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी शेड अनधिकृत असल्याचे सांगत, घोडे माथेरानच्या पर्यटनाचे अविभाज्य अंग असल्याने त्यांच्या पर्यायी निवाऱ्याबाबत प्रस्ताव मागवले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रशासन आणि अश्वपालक यांच्यात तोडगा निघेपर्यंत घोड्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न अनिश्चित आहे.
---------
नगर परिषदेच्या कारवाईवर तीव्र टीका करत आहोत. माथेरान नियमावली १९५९ मध्ये परवानाधारक घोड्यांच्या निवाऱ्याची जबाबदारी नगर परिषदेकडे असल्याचे स्पष्ट नमूद आहे. नियम पाळण्याऐवजी त्यांचेच उल्लंघन करून आमच्या व्यवसायावर घाला घातला जात आहे. प्रशासनाने पार्किंगसोबत घोड्यांसाठी स्वतंत्र जागा कायमस्वरूपी उपलब्ध करावी. मागणी मान्य न झाल्यास आम्ही न्यायालयात धाव घेऊ.
- संतोष शिंगाडे, अध्यक्ष, मूळवाशीय अश्वपाल संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.