मधुमेहामुळे होणाऱ्या गुंतागुंतीची मिळणार पूर्वसूचना
रक्तातील सुप्त घटकांचा शोध; आयआयटी मुंबईतील संशोधन
मुंबई, ता. ४ ः आयआयटी मुंबई आणि हैदराबादमधील उस्मानिया वैद्यकीय महाविद्यालयातील हैदराबाद येथील संशोधकांनी मधुमेहासंबंधित मूत्रपिंड विकार प्रारंभिक अवस्थेत ओळखू शकणारे महत्त्वपूर्ण असे संशोधन संयुक्तपणे केले आहे. यात मधुमेहामुळे होणाऱ्या गुंतागुंतीची पूर्वसूचना देणारे रक्तातील सुप्त घटक ओळखले जाणार असून यामुळे रुग्णाला मधुमेहासंबंधित मूत्रपिंड विकारांवर लवकर आणि वैयक्तिक उपचार शक्य होणार आहे.
या नव्या संशोधनामुळे मधुमेहासंबंधित मूत्रपिंड विकारांचा धोका असलेल्या रुग्णांना लवकर ओळखण्याची नवी आशा निर्माण केली आहे. रक्तातील काही विशिष्ट जैवरासायनिक घटक (मेटाबोलाईट्स) वापरून हे शक्य होणार आहे, जे रुग्णांसाठी अनुरूप उपचारपद्धती निश्चित करण्यास मदत होणार असून याचा भारतातील लाखो रुग्णांना येत्या काळात लाभ होण्याचा मार्ग मिळणार असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
आयआयटी मुंबईतील प्रा. प्रमोद वांगीकर आणि उस्मानिया वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. राकेश कुमार सहाय तसेच डॉ. मनीषा सहाय यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी पुण्यातील क्लॅरिटी बायोसिस्टीम्स इंडिया प्रा. लि. येथील संशोधकांसह एका नवीन अभ्यासात मूत्रपिंड विकारांमध्ये गुंतागुंतीचा धोका असलेल्या रुग्णांना ओळखण्यासाठी रक्तातील काही जैवरासायनिक नमुन्यांचा उपयोग करता येईल का, याचा शोध घेतला. त्यांनी ‘मेटाबोलॉमिक्स’ म्हणजे रक्तातील लहान रेणूंच्या अभ्यासाचा उपयोग केला. अभ्यासाचे निष्कर्ष जुलै २०२५ मध्ये ‘जर्नल ऑफ प्रोटीओम रिसर्च’ मध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या अभ्यासामुळे डॉक्टरांना मधुमेहाचे निदान लवकर करण्यासाठी आणि रुग्णासाठी वैयक्तिक पातळीवर अनुरूप उपचार ठरवण्यास मदत होऊ शकणार आहे.
या नव्या संशोधनामुळे पुढील काळात बोटाला छोटीशी सुई टोचून काढलेल्या रक्ताच्या वाळलेल्या थेंबांवर आधारित चाचणी विकसित करण्यावर संशोधक काम करत आहेत. यामुळे चाचणी घेणे अधिक सोपे होईल. सध्या हा अभ्यास मर्यादित नमुन्यांवर करण्यात आला असला तरी हे संशोधन व्यापक प्रमाणात करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे भविष्यात भारतात मधुमेहासाठी वैयक्तिक पातळीवरील निदान आणि उपचारपद्धती विकसित करण्याचा मार्ग मोकळा होईल.
सर्वाधिक रुग्ण भारतात
सध्या भारतात सुमारे १० कोटी प्रौढ व्यक्ती टाइप २ मधुमेहाने त्रस्त आहेत, तर आणखी १३ कोटी व्यक्तींना ‘प्रीडायबेटीस’ (मधुमेहपूर्व अवस्था) आहे. पाश्चात्त्य लोकांच्या तुलनेत भारतीयांमध्ये कमी वयात, कमी ‘बीएमआय’ असूनही मधुमेह होतो आणि त्यांना मूत्रपिंड विकारासारख्या गुंतागुंतीचा धोका जास्त असतो. त्यामुळे भारतीय रुग्णांमधील चयापचय क्रियांचे नमुने (मेटाबोलिक पॅटर्न) तपासणे आवश्यक होते. या पार्श्वभूमीवर हे संशोधन भारतीयांसाठी मोठे लाभदायक ठरणार आहे.
असे केले संशोधनासाठी परीक्षण
- जून २०२१ ते जुलै २०२२ दरम्यान हैदराबादमधील उस्मानिया रुग्णालयातून या अभ्यासासाठी स्वेच्छेने रक्त दिलेल्या ५२ व्यक्तींचे संपूर्ण रक्तनमुने गोळा केले.
- या व्यक्तींमध्ये १५ निरोगी व्यक्ती (तुलनेसाठी नियंत्रण गट), टाइप २ मधुमेहाचे २३ रुग्ण आणि मधुमेहासंबंधित मूत्रपिंड विकाराचे १४ रुग्णांचा समावेश होता.
- ‘लिक्विड क्रोमॅटोग्राफी-मास स्पेक्ट्रोमेट्री’ आणि ‘गॅस क्रोमॅटोग्राफी-मास स्पेक्ट्रोमेट्री’ या दोन पूरक तंत्रांचा वापर करून ३०० मेटाबोलाईट्ससाठी परीक्षण केले.
- मधुमेही रुग्ण आणि नियंत्रण गटातील निरोगी व्यक्ती यांच्यात फरक दर्शविणारे २६ मेटाबोलाईट्स आढळले.
- मधुमेह केवळ साखरेचे नियंत्रण व्यवस्थित नसणे एवढ्यापुरता मर्यादित नसून, हा चयापचयाचा एक व्यापक विकार असल्याचेही आढळून आल्याचे प्रा. वांगीकर यांनी सांगितले.
-------
भारतात अनेकदा मधुमेहावर सर्वांसाठी सरसकट एकच उपाय, असा दृष्टिकोन असतो. आमच्या अभ्यासातील नवीन सूचकांच्या मदतीने प्रत्येक रुग्णाच्या विशिष्ट रोग-स्वरूपानुसार उपचार निश्चित करता येतील.
- स्नेहा राणा, अभ्यासाच्या प्रमुख लेखिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.