शेअर ट्रेडिंग फसवणूकप्रकरणी सात अटकेत!
सायबर गुन्हेगारांचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन आणि कंबोडियापर्यंत
नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : नवी मुंबई सायबर पोलिसांनी शेअर बाजारात मोठा नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सात जणांच्या आंतरराष्ट्रीय टोळीला अटक केली आहे. अटकेतील तीन आरोपी टेलीग्राम ॲपद्वारे चीन आणि कंबोडियातील सायबर फ्रॉडस्टरच्या संपर्कात होते. त्यामुळे या सायबर गुन्हेगारांचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन आणि कंबोडियापर्यंत जोडले गेल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे.
या टोळीने खारघरमधील एका डॉक्टरकडून तब्बल एक कोटी सात लाख ८० हजार रुपये उकळले होते. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांच्या पथकाने तातडीने या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, फसवणुकीची रक्कम ज्या पहिल्या स्तरावरील चालू खात्यात वळती झाली, त्या खातेधारक सुरेश तळेकर (वय २९) याला पुण्यातील खराडी येथून अटक करण्यात आली. त्यानंतर सायबर पोलिसांनी सुरेश तळेकर याचा साथीदार विकास आव्हाड (वय ३०) याला पुण्यातील हवेली येथून अटक केली. अधिक तपास करत पोलिसांनी विशाल व्हनमाने (२४) या आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, तो टेलीग्राम ग्रुपवरील अनोळखी आयडीधारकांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल पाटील व पोलिस निरीक्षक गणेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नवी मुंबईतील महापे, सानपाडा, कोपरखैरणे, एपीएमसी आणि वाशी परिसरातील जवळपास ३५ ते ४० लॉज व हॉटेल्सची तपासणी केली. अखेरीस, एपीएमसीतील हॉटेल राधे रेसिडेंसीमध्ये पोलिसांनी छापा मारून आणखी पाच आरोपींना अटक केली. त्यातील तीन आरोपी टेलीग्राम ॲपद्वारे चीन आणि कंबोडिया येथील सायबर फ्रॉडस्टरच्या संपर्कात असल्याचे त्यांच्या चौकशीत आढळले.
ओटीपी फॉरवर्ड करण्याचे रॅकेट
आरोपी विविध राज्यांतून मिळवलेल्या चालू बँक खात्यांचे सिम कार्ड वापरून, ‘ओके गो एसएमएस ॲन्ड सेंडर ॲप’द्वारे बँक ट्रान्झॅक्शनचे ओटीपी चीन-कंबोडियातील फ्रॉडस्टरना फॉरवर्ड करत होते. फ्रॉडस्टर हे सदर ओटीपीचा वापर करून वेगवेगळ्या व्यक्तींची फसवणूक करून मिळवलेली रक्कम वेगवेगळ्या खात्यात वळती करून ती काढत होते. त्यानंतर सायबर पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये देशभरातील ११८ बँक खाती गोठवत त्यातील तब्बल ३२ लाख ५० हजार रुपयांची रक्कम गोठविली.
पोलिसांचे आवाहन
नागरिकांनी समाजमाध्यमांवर मोठ्या नफ्याचे प्रलोभन दाखवणाऱ्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये. जास्त नफ्याच्या प्रलोभनाला बळी पडू नका. आपली वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि खात्री केल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नका. फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधून तक्रार करावी. वेळेवर तक्रार केल्यास रक्कम गोठवून ती परत मिळण्याची शक्यता आहे, असे आवाहन पोलिस उपआयुक्त सचिन गुंजाळ यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.