अपघात विसरला, पण वेदना नाही!
मुंब्रा रेल्वे दुर्घटनेतील पीडित मदतीच्या प्रतीक्षेत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंब्रा रेल्वे दुर्घटनेला साधारण पाच महिने उलटले, पण त्या दिवशी गमावलेले प्राण, मोडलेली स्वप्ने आणि उद्ध्वस्त झालेली कुटुंबे अजूनही त्याच ठिकाणी थांबली आहेत. अपघात विसरला, पण वेदना नाही. अपघाताच्या पाच महिन्यांनंतर मृत आणि जखमी कुटुंबीयांना एक रुपयाही मिळालेला नाही. पीडित कुटुंबीय अजूनही शासनाच्या दारात हेलपाटे मारत आहेत.
कसारा-सीएसएमटी आणि सीएसएमटी-कर्जत लोकलमध्ये ९ जून रोजी मुंब्रा परिसरात झालेल्या धडकेत पाच प्रवाशांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. त्या वेळी राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख आणि जखमींना ५० हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत मदतीची घोषणा केली. मात्र पाच महिने उलटले तरी या घोषणा कागदावरच आहेत. या दुर्घटनेत ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यातील शिपाई विकी मुख्यदल यांचा मृत्यू झाला. विकी यांची पत्नी दीपाली मुख्यदल आजही सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहे. ‘आम्हाला पाच लाख रुपये मदत मिळणार,’ असे सांगण्यात आले, पण आजवर एक रुपयाही मिळालेला नाही. तहसील कार्यालयात गेले की कागद पुढे गेलेत एवढंच सांगितले जाते. विकी गेले, घर उद्ध्वस्त झालं. आता माझं लहान मूल आणि मी एवढंच उरलंय,’ असे सांगताना दीपाली यांच्या डोळ्यात अश्रू दाटतात. विकी यांच्या मृत्यूनंतर त्या माहेर जालना येथे गेल्या. ‘ठाण्याच्या गजबजाटात जगायचे होते, पण आता तिथे जाण्याचीही भीती वाटते,’ असं त्या म्हणतात. त्यांनी रेल्वे पोलिस दलात पतीच्या जागेवर नोकरी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
‘सरकारकडून फक्त दिलासा, उपचार मात्र आपल्या खिशातून’
उल्हासनगरमधील प्रियांका भाटीया या अपघातात गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या हात आणि गुडघ्याला मोठी दुखापत झाली. ‘सुरुवातीला रुग्णालयातील प्राथमिक उपचाराचा खर्च सरकारने केला, पण त्यानंतर जे काही उपचार झाले त्याचा सगळा खर्च आम्हालाच उचलावा लागला. गुडघ्याचे दुखणे अजूनही आहे. प्लॅस्टर लावलं आहे. कामावरून सुट्टी घ्यावी लागली. अपघातामुळे पाच महिने वाया गेले. नोकरी आणि तब्येत दोन्ही बिघडली,’ असं प्रियांका सांगतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, दुर्घटनेत अनेक प्रवाशांचे मोबाइल, कागदपत्रे आणि कमाईचे साधनसुद्धा नष्ट झाले. सरकारने दिलेले आश्वासन हवेतच विरले. आता आम्हाला वाटतं, की आपण जिवंत राहिलो हेच पुरेसे आहे, असे त्या सांगतात.
मृत प्रवासी : ५
जखमींची संख्या : ८
मृतांसाठी घोषित मदत : ५ लाख
जखमींसाठी घोषित मदत : ५०,००० ते २ लाख
प्रत्यक्ष मिळालेली मदत : शून्य
प्रतीक्षेचा कालावधी : पाच महिने
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.