हेदवली पुलावरील खड्डे ग्रामस्थांनी बुजवले
मुरबाड, ता. ६ (बातमीदार) ः तालुक्यातील हेदवली व कातकरी वाडीतील ग्रामस्थांना टोकावडे गावात येण्यासाठी कनकवीरा नदीवर पूल बांधण्यात आला आहे. या पुलाची उंची कमी असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जातो व ग्रामस्थांचा संपर्क तुटतो. हेदवली परिसरातील शेतकऱ्यांना खरेदी-विक्रीसाठी आणि विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी टोकावडे येथे जावे लागते. पावसाळ्यात पूल पाण्याखाली गेल्याने पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होते; मात्र हे खड्डे बुजवण्याचे काम करण्याची तत्परता संबंधित शासकीय विभाग दाखवत नाही. त्यामुळे गावातील नागरिकांनी खडी व मुरूम टाकून श्रमदानातून या पुलावरील खड्डे बुजवले आहेत.
फोटो ओळी
मुरबाड ः तालुक्यातील हेदवली येथील नदीच्या पुलावर पडलेले खड्डे ग्रामस्थांनी बुजवले.