वाडा औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांची दयनीय अवस्था
कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड; ठोस पावले उचलण्याची मागणी
वाडा, ता. ९ (बातमीदार) ः ठाणे जिल्ह्यातील वाडा तालुका एकेकाळी आशियातील प्रसिद्ध औद्योगिक केंद्र म्हणून ओळखला जात होता, परंतु गेल्या काही वर्षांपासून एकामागून एक कारखाने बंद पडत असल्याने हजारो कामगार बेकार झाले आहेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. कारखाने पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी कामगार, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
सुमारे ३० वर्षांपूर्वी वाडा तालुक्याच्या विकासासाठी ‘डी प्लस झोन’ योजना राबवण्यात आली होती. या योजनेअंतर्गत कारखानदारांना वीज, कर आणि जमिनीच्या दरांमध्ये अनेक सवलती मिळाल्या. त्यामुळे बहुलका स्टील, प्रणय कास्टिंग, वैष्णव इंडस्ट्रीज, तोरणा इस्पात, जय ज्योतावली रोलिंग मिल, कुडूस स्टील यांसारख्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी वाड्यात उत्पादन सुरू केले, मात्र वाढलेल्या विजेच्या दरांमुळे उत्पादनखर्च वाढला आणि नफ्यात घट झाली. परिणामी अनेकांनी कारखाने बंद करण्याचा निर्णय घेतला. कुडूस येथील ‘ओनिडा’ कंपनीने काही महिन्यांपूर्वीच आपला गाशा गुंडाळला. टीव्ही आणि एसीनिर्मिती करणाऱ्या या कंपनीत काम करणाऱ्या शेकडो कामगारांचा रोजगार गेला. तसेच, ‘मोनाटोना टायर’ या कंपनीतील जवळपास हजार कामगार बेरोजगार झाले. कर्जफेड न झाल्याने बँकेने कंपनीचा लिलाव केला आणि सध्या तिथे फक्त रिकामी जागा उरली आहे. घोणसई, बुधावली, विजयपूर, मेट आणि नेहरोली परिसरातील मेटाफिल्ड, कलरट्युन, टेक्सप्लास्ट, आय. जी. स्टील यांसारख्या शेकडो लघु-मध्यम उद्योगांचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. एकेकाळी एक हजारांहून अधिक कारखाने असलेल्या या औद्योगिक पट्ट्यात आता ३५ ते ४० टक्के कारखानेच कार्यरत आहेत.
.......................
वाडा औद्योगिक क्षेत्रात स्थानिक आणि परप्रांतीय हजारो कामगार कार्यरत आहेत. सरकारने कारखानदारांना पुन्हा सवलतींचा लाभ दिला, तर उद्योगधंद्यांना पुन्हा गती मिळेल, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गोविंद पाटील यांनी सांगितले, तर सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर यांनी म्हटले, की कारखाने का बंद झाले याचा तपास उद्योग मंत्रालयाने समिती स्थापन करून करावा. सरकारने बंद पडलेले कारखाने पुन्हा सुरू करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.