बदलापुरात पाण्यासाठी रास्ता रोको
सहा महिन्यांपासून नळ कोरडे; रहिवाशांचा जीवन प्राधिकरणावर मोर्चा!
बदलापूर, ता. १० (बातमीदार) : बदलापूर पश्चिमेकडील हेंद्रे पाडा परिसरातील मोहन तुलसी विहार या मोठ्या गृहसंकुलात गेल्या सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा ठप्प असल्याने संतप्त रहिवाशांनी सोमवारी (ता. १०) सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. १३०० सदनिकांपैकी तब्बल ६०० सदनिकांना एक थेंबही पाणी मिळत नाही, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
बदलापूर पश्चिमेकडील हेंद्रेपाडा परिसरातील सुशिक्षित व उच्चभ्रू असलेल्या या तुलसी विहार संकुलातील रहिवाशांचे पाण्यावाचून मोठे हाल सहन करावे लागत आहे. अखेर पाण्याच्या त्रासाला वैतागून या रहिवाशांनी संकुलाच्या बाहेर रास्ता रोको केला. या वेळी आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली. पोलिसांच्या विनंतीनंतर नागरिकांनी रस्ता मोकळा करत मोर्चा वळवून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली. या वेळी रहिवाशांनी जोरदार घोषणाबाजी करत ‘पाणी द्या, पाणी द्या!’, ‘पाणी नाही, तर आम्ही कार्यालयाबाहेर आंदोलन करू!’ अशा घोषणा दिल्या.
रहिवाशांनी प्रशासनासमोर आपल्या वेदना मांडल्या. सहा महिन्यांपासून पाहण्यासाठी रोज संघर्ष करावा लागत आहे. या त्रासामुळे बदलापूर सोडून इतर ठिकाणी निघून जावेसे वाटत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी व्यक्त केली.
तर काही रहिवाशांनी राजकीय दबावाखाली पाणीपुरवठा रोखण्यात येतोय का, असा थेट प्रश्न उपस्थित केला आहे. तुमच्या राजकारणाशी आमचा काही एक संबंध नाही, आमची कोणत्याही पक्षाशी बांधिलकी नाही. त्यामुळे आम्हाला त्रास देऊ नका, असा त्रागा या रहिवाशांनी व्यक्त केला. पाणी नसल्याने गृहिणींची चिडचिड, मुले व ज्येष्ठ नागरिकांचा त्रास आणि नोकरदारांना कामावर जाण्यात अडथळे अशा अनेक समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठ्याच्या या दीर्घकाळच्या समस्येविरोधात संतप्त रहिवाशांनी संकुलाबाहेर रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे स्थानिक राजकीय उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.
नोकरी सोडून पाण्यासाठी दारोदार फिरावे लागत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहोत. पाण्याच्या समस्येतून आमची सुटका कधी होणार? आम्ही कामावर रजा मारून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात किती वेळा आमच्या समस्या मांडायला यायचे? आमचे पाण्याची समस्या लवकरात लवकर मार्गी लावावी अन्यथा आम्ही उग्र आंदोलन छेडू!
शालिग्राम अमृतकर, रहिवासी, तुलसी विहार
घरात पाणी नसल्यामुळे घरातील महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारी माणसे यांची मानसिक चिडचिड होत आहे. रोज घरात पाण्यावर वाद होत आहेत. एकीकडे घराचे हप्ते अजून आम्ही फेडत आहोत, दुसरीकडे पाणीच येत नसल्यामुळे घरात मानसिक शांततादेखील मिळत नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आमच्या पाणी समस्येवर तोडगा काढला नाही, तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाबाहेर आम्ही उपोषणाला बसू.
राजश्री भालेराव, रहिवासी, तुलसी विहार
तुलसी विहार गृहसंकुलातील रहिवाशांनी कार्यालयात आणलेल्या मोर्चाची आम्ही दखल घेतली असून, त्यांच्याशी चर्चाही केली आहे. एकूण १४ इमारतींपैकी १० इमारतींपर्यंत पाणी पोहोचत आहे. पुढच्या चार इमारतींपर्यंत पाणी का पोहोचत नाही, यासंदर्भात आजच कर्मचाऱ्यांसोबत गृहसंकुलातील जलवाहिन्यांची तपासणी करून तोडगा काढला जाईल.
सुरेश खाद्री, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बदलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.