शहापूर, ता. १० (वार्ताहर) : तालुक्यातील किन्हवली परिसरातील सावरोली (सो) ग्रामपंचायत हद्दीतील नामपाडा लघुपाटबंधारे प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे. केंद्रीय वनविभागाची मंजुरी आणि निधीअभावामुळे १५ वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प आता सुरू होणार आहे. नव्या प्रशासकीय व आर्थिक मान्यतेनंतर २७ कोटी २४ लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. वर्षाअखेरीस प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग, भातसा प्रकल्प वसाहत शहापूर यांनी दिली आहे. त्यामुळे सावरोलीसह परिसरातील १३ गावपाड्यांतील शेतकऱ्यांच्या पिकांना अखेर पाण्याचा शाश्वत आधार मिळणार आहे.
सावरोली (सो) ग्रामपंचायत हद्दीतील नानी नदीच्या कुतरकुंड डोहाजवळील या प्रकल्पाचे काम २००९ मध्ये सुरू झाले होते. मात्र, प्रकल्पासाठी लागणारी ३८.९८ हेक्टर वनजमीन केंद्रीय वनविभागाकडून अंतिम मंजुरी न घेताच काम सुरू केल्याने वनखात्याने ते थांबवण्याचे आदेश दिले. त्यानंतर २०१० पासून प्रकल्पाचे काम पूर्णपणे ठप्प झाले आणि फाइल लाल फितीत अडकली. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या वनजमिनीच्या बदल्यात वाकला (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) आणि साजे (ता. माणगाव, जि. रायगड) येथे अनुक्रमे १०.२० व २८.७८ हेक्टर जमीन वनविभागाला वर्ग करण्यात आली. अखेर ११ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय वनविभागाने हस्तांतराला मंजुरी दिली. त्यानंतर सावरोली आणि आपटे ग्रामपंचायत क्षेत्रातील एकूण ३८.९८ हेक्टर राखीव व संवर्धित वनजमीन प्रकल्पासाठी वर्ग करण्यात आली आहे.
नव्या मंजुरीनंतर कामाला गती
रखडलेल्या नामपाडा लघु पाटबंधारे प्रकल्पाला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आल्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये सरकारने प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. त्यानंतर जलसंपदा विभाग दरसूची २०१६-१७ व बांधकाम विभाग दरसूची २०१७-१८ नुसार प्रकल्पासाठी एकूण ३८ कोटी ६८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, प्रत्यक्ष आर्थिक तरतूद न झाल्याने काम पुन्हा थांबले. आता पाटबंधारे विभागाने खर्च झालेले १२ कोटी वगळून उर्वरित कामासाठी २७ कोटी २४ लाख ६५ हजार रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. नव्या ठेकेदार एजन्सीकडून उर्वरित काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. मातीकाम, सांडवा आणि अन्य पूरक कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. लवकरच १३ गावपाड्यांचे लक्ष लागून राहिलेला नामपाडा लघुपाटबंधारे प्रकल्प पूर्णत्वास जाण्याची आशा निर्माण आली आहे.
आचारसंहिता संपल्यानंतर सुरुवात
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून नामपाडा प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. त्यामुळे १५ वर्षांची प्रतीक्षा संपून प्रकल्प मार्गी लागेल, असे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अ. सु. शहाणे यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.