सोबत या, चांगले सरकार देऊ
भाजपमध्ये गेलेल्या म्हात्रे यांची पाटलांना खुलेआम ऑफर
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० ः शिवसेना ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दीपेश म्हात्रे यांनी प्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी मनसेचे आक्रमक नेते राजू पाटील यांना उघडपणे सोबत येण्याचे आमंत्रण दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे. आपण सोबत या, एकत्र आलो तर शहराला चांगले सरकार देऊ, असे म्हणत त्यांनी राजू पाटील यांना गळ घातली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही ऑफर दिली गेल्याने भाजप आता मनसेच्या मतपरिसरावर थेट शिरकाव करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
दीपेश म्हात्रे म्हणाले की, भाजपने कल्याण-डोंबिवलीत विकासाचा नवा अध्याय लिहिला आहे. राजू पाटील आमच्या सोबत आले, तर एकत्रित येऊन शहराला चांगले सरकार देऊ. अप्रत्यक्षपणे त्यांनी पाटील आणि मनसेला भाजपसोबत येण्याची ऑफर दिली. राजू पाटील यांना उद्देशून दिलेल्या या ऑफरमुळे भाजप आता मनसेच्या नेतृत्वाशी थेट संपर्क वाढवू पाहात असल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सत्ताकेंद्रे बदलत आहेत. शिंदे गटानंतर आता मनसेच्या बालेकिल्ल्यावर भाजपची नजर गेल्याचे संकेत दीपेश म्हात्रेंच्या वक्तव्याने दिले आहेत.
दीपेश म्हात्रे यांनी भाजप प्रवेशापूर्वीच महापालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली होती. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की विजय मिळवण्याकरिता मजबूत साथ आवश्यक आहे आणि त्यासंदर्भात राजू पाटील यांच्याशी हातमिळवणी फायदेशीर ठरू शकते, अशी त्यांची भूमिका आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे युतीच्या शक्यतेचे संकेत आता प्रथमच स्पष्टपणे जाणवत आहेत. मनसे आणि भाजप एकत्र आले, तर विरोधकांसाठी समीकरण आव्हानात्मक ठरणार असून, शहरातील राजकारणात तिसऱ्या शक्तीचे स्थान बदलू शकते. कल्याण-डोंबिवलीत सत्ता मिळवण्यासाठी आता प्रवेश, ऑफर आणि हालचालींची नवी मालिका सुरू झाली आहे.
आम्ही किती दिवस विरोधात राहणार ः राजू पाटील
आपल्या शैलीत प्रतिक्रिया देताना राजू पाटील म्हणाले, आम्ही किती दिवस विरोधात राहणार? शहराचा विकास करण्यासाठी सत्ता लागते. जिथे विरोध करायचा, तिथे मी करतोच, पण काही लोकांना पाठीचा कणा उरलेला नाही. अनेक जण मिंधे झालेत. राजकारणी सरपटणारे प्राणी झाले आहेत, आत्मसन्मान संपला आहे, अशी टीका त्यांनी अप्रत्यक्षपणे केली आहे. नाव न घेता केलेल्या या टीकेने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या विधानावरून त्यांनी ज्यांच्यावर निशाणा साधला आहे ते कोण, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.