शिल्पा शेट्टीची उच्च न्यायालयात धाव
६० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : जवळपास ६० कोटी रुपयांचा फसवणुकीचा गुन्हा रद्द करण्यासाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने पती राज कुंद्रासह उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला हा गुन्हा रद्द करण्याची प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी गुन्हा रद्द करण्याची मागणी करण्याव्यतिरिक्त पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यापासून रोखणे आणि प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत त्यांच्याविरोधात कोणतही कठोर कावाई न करण्याचे आदेश देण्याची मागणीही या याचिकेत केली आहे. या याचिकेवर सोमवारी (ता. १०) मुख्य न्या. श्री चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी पार पडली. तेव्हा याचिकेची प्रत मूळ तक्रारदार दीपक कोठारी यांना देण्याचे आदेश देऊन न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी २० नोव्हेंबर रोजी ठेवली. दरम्यान, खोट्या तथ्यांच्या आधारावर तसेच पैसे उकळण्याच्या कुहेतूने हा गुन्हा दाखल केल्याचा दावा या दाम्पत्याने याचिकांमध्ये केला आहे. संबंधित कंपनीच्या दैनंदिन कामकाजात सहभागी नव्हते. फारच मर्यादित काळासाठी कंपनीशी संबंध आल्याचा दावा शिल्पा यांनी याचिकेत केला आहे. अनपेक्षितपणे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे कंपनी कोसळली, विशेषतः नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीमुळे रोखीवर आधारित व्यवसायावर गंभीर परिणाम झाल तसेच झालेले नुकसान केवळ व्यावसायिक नुकसान होते आणि कोणालाही फसवण्याचा किंवा गुन्हेगारी कटाचा हा भाग नसल्याचा दावाही या याचिकेत करण्यात आला आहे.
काय प्रकरण?
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी हे ‘बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड’ या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मचे संचालक होते. फिर्यादी व्यावसायिक दीपक कोठारी यांनी २०१५ ते २०२३ दरम्यान या कंपनीत ६० कोटी ४८ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. या कंपनीतील ८७.६ टक्के शेअर्स या दोघांच्या नावावर होते. कोठारी यांनी एप्रिल २०१५मध्ये त्यांनी ‘शेअर सबस्क्रिप्शन ॲग्रीमेंट’अंतर्गत कंपनीत ३१.९ कोटी रुपये गुंतवले. त्यानंतर सप्टेंबर २०१५ मध्ये सप्लिमेंटरी ॲग्रीमेंटअंतर्गत आणखी २८.५३ कोटी रुपये वळवले (ट्रान्सफर) केले. मात्र शिल्पा आणि राज यांनी ही रक्कम वैयक्तिक खर्चासाठी वापरली, असा आरोप कोठारी यांनी तक्रारीत केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.