एचडीएफसी सर्कलवर वाहतूक कोंडी;
ठेकेदाराचे चुकीचे नियोजन, पोलिसांवर ताण
नवीन पनवेल, ता. ११ (बातमीदार) ः नवीन पनवेलमधील एचडीएफसी सर्कल परिसरात महापालिकेच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली असून, ठेकेदाराच्या चुकीच्या नियोजनामुळे नागरिक आणि वाहनचालक हैराण झाले आहेत. दिवसभर वाहतूक कोंडीची परिस्थिती कायम राहात असून, याचा ताण थेट वाहतूक पोलिसांवर येत आहे.
पनवेल शहर, नेरे, तळोजा एमआयडीसी आणि महामार्गाकडे जाण्याचा मुख्य मार्ग म्हणून एचडीएफसी सर्कलला विशेष महत्त्व आहे. या मार्गावर बँकांची कार्यालये, सिडको तसेच नामांकित बांधकाम व्यावसायिकांची कार्यालये असल्यामुळे सकाळ-सायंकाळी वाहनांची प्रचंड गर्दी असते. गर्दी नियंत्रणासाठी सहा वर्षांपूर्वी सर्कल अरुंद करून सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली होती, मात्र आता सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू करताना ठेकेदाराने टप्प्याटप्प्याने काम करण्याऐवजी संपूर्ण रस्ता उकरून ठेवल्याने मार्गच अरुंद झाला आहे. परिणामी वाहतूक कोंडी इतकी गंभीर झाली आहे की, वाहनांच्या रांगा थेट सिडको कार्यालय, मोहिते रुग्णालय आणि महामार्ग पुलापर्यंत पोहोचतात. पनवेलहून नवीन पनवेलकडे येताना उड्डाणपूल पूर्णतः जाम होत असून, पाच मिनिटांच्या अंतराला अर्धा तास लागत आहे. या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. एका वाहतूक पोलिसाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, ठेकेदाराच्या अव्यवस्थित कामामुळे आमच्यावरचा ताण वाढला आहे; रोज शेकडो वाहनचालकांशी संघर्ष करावा लागतो. दरम्यान, पनवेल महापालिकेकडून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पनवेलहून येणाऱ्यांनी विचुंबे मार्गे नवीन पनवेल गाठावे, तर कळंबोलीकडून येणाऱ्यांनी खांदा कॉलनी मार्ग वापरावा, अशा सूचना फलकांवर देण्यात आल्या आहेत.
...............
उड्डाणपुलावर शाळेच्या बस, व्हॅनची कोंडी
सकाळच्या वेळी शाळेच्या बस आणि व्हॅन या उड्डाणपुलावर अडकून पडतात. विद्यार्थ्यांना शाळेत वेळेत पोहोचता येत नसल्याने पालक आणि चालक त्रस्त आहेत. कधी कधी रुग्णवाहिकाही या कोंडीत अडकते, ज्यामुळे गंभीर रुग्णांना वेळेवर मदत मिळत नाही, असे बसचालक नरेश पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.