किल्ले बांधणी स्पर्धेचे बक्षीस वितरण
मुरूड (बातमीदार) ः दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने श्री शिवभक्त मित्र मंडळ, मजगाव यांच्या वतीने तालुकास्तरीय किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मजगाव येथील विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. छोट्या गटात पार्थव भेर्ले (किल्ले पन्हाळा) प्रथम, अर्णव काटकर (प्रतापगड) द्वितीय, अर्चित ठाकूर (पद्मदुर्ग) तृतीय तर हिमांशू पाटील व कुशल गुंड यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. मोठ्या गटात शौर्य मोकल (रायगड) प्रथम, सोहम भेर्ले (पद्मदुर्ग) द्वितीय तर आर्यन मसाल, वेदांत तळेकर आणि यश पाटील यांनी संयुक्त तृतीय क्रमांक पटकावला. कार्यक्रमात मुरूड पोलिसांनी आयोजित केलेल्या ‘एकता मॅरेथॉन’मधील विजेता सर्वेश काबुकर आणि कराटे स्पर्धेत यश मिळविणाऱ्या रेश्मा भोईर व काव्या नाक्ती यांचाही गौरव करण्यात आला. या वेळी विघ्नेश माळी यांनी “शिवरायांचे किल्ले हे आपल्या इतिहासाचे प्रतीक असून त्यांचे संवर्धन ही आपली जबाबदारी आहे, असे सांगितले.
...............
पेणच्या दिव्यांग विद्यार्थ्यांची कामगिरी
पेण (वार्ताहर) ः पेण रामवाडी येथील ‘आई डे केअर संस्था’ संचालित गतिमंद मुलांसाठीच्या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत अभूतपूर्व यश मिळवले आहे. गोरेगाव येथे झालेल्या १६व्या महाराष्ट्र स्टेट टेबल टेनिस स्पर्धेत संस्थेतील सात दिव्यांग विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावून पेणचा झेंडा उंचावला आहे. १२ ते १५ वर्षांच्या वयोगटात भावार्थ म्हात्रे यांनी गोल्ड मेडल मिळवले. तर १६ ते २१ वर्षांच्या गटात तन्मय मोकल, धनंजय चंदने आणि यज्ञेश पाटील यांनीही विजेतेपद पटकावले. त्याचप्रमाणे २१ वर्षांवरील वयोगटात सुयोग पाटील, प्रणव टिबे आणि आदित्य रामकृष्णन यांनीही सुवर्णपदक जिंकले. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल ‘आई डे केअर संस्था’च्या अध्यक्षा स्वाती मोहिते, प्रशिक्षक सिद्धांत म्हात्रे, तसेच शिक्षक आणि पालकांनी मन:पूर्वक अभिनंदन केले. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडाक्षेत्रातील या उल्लेखनीय कामगिरीमुळे समाजात प्रेरणादायी संदेश गेला असून, संस्थेचे नाव राज्यभर गाजले आहे. योग्य प्रशिक्षण, सहकार्य आणि आत्मविश्वासामुळेच हे यश शक्य झाल्याचे मार्गदर्शकांनी नमूद केले.
.................
ठाकूर वेडी येथे काळभैरव जयंती उत्सवाचे आयोजन
पेण (बातमीदार) ः पेण तालुक्यातील ठाकूर वेडी येथे यंदाही काळभैरव जयंती निमित्ताने दोन दिवसांचा धार्मिक उत्सव मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. हा उत्सव ११ व १२ नोव्हेंबर रोजी होणार असून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. मंगळवारी सकाळी कलशपूजन व ध्वजपूजनाने सोहळ्याची सुरुवात होईल. यानंतर गोरखनाथ संगीत मंडळाच्या भजन सादरीकरणाने कार्यक्रम रंगणार आहे. संध्याकाळी धीरज ठाकूर-काळे यांचे संगीत भजन तर रात्री ह.भ.प. तेजस्वी ओक (डोंबिवली) यांचे कीर्तन होईल. बुधवारी पहाटे काकड आरतीनंतर सकाळी पुन्हा तेजस्वी ओक यांचे कीर्तन व संध्याकाळी सीमा कराड यांचे संगीत भजन होणार आहे. रात्री गावदेव महिला भजनी मंडळाचे सादरीकरण तसेच सुजाता पाटील, श्रीकृष्ण भाई, लगिरी ठाकरे यांच्या गायन व वाद्यसंगतीने वातावरण भक्तिमय होणार आहे. श्री काळभैरवाची प्रदक्षिणा होऊन उत्सवाची सांगता होईल. ठाकूर वेडी गावातील ग्रामस्थांनी सर्व भक्तांना उपस्थित राहून भक्तिभावाने उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.