मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांचे निधन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार (वय ५९) यांचे मंगळवारी (ता. १०) पहाटे निधन झाले. १ ऑक्टोबर रोजी त्यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदाची सूत्रे स्वीकारली होती. झोपेत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तत्काळ जसलोक रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.
विजय कुमार हे रेल्वेसेवेत आपल्या कार्यक्षमतेसाठी आणि दूरदृष्टीसाठी ओळखले जात. तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम करत भारतीय रेल्वेच्या अनेक प्रकल्पांत मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनाने रेल्वे प्रशासनातील एक अनुभवी, अभ्यासू आणि नेतृत्वक्षम अधिकारी गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. विजय कुमार यांनी नुकताच मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदाचा पदभार स्वीकारला होता. त्याआधी ते चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्सचे (सीएलडब्ल्यू) महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली सीएलडब्ल्यूने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये तब्बल ७०० लोकोमोटिव्हचे विक्रमी उत्पादन केले. ते पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज, चंडीगड येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बी. टेक. पदवीधर होते. १९८८च्या बॅचमधील इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत उत्तर रेल्वे, उत्तर पश्चिम रेल्वे, रेल्वे बोर्ड, आरडीएसओ आणि नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये काम केले. त्यांनी टॅल्गो ट्रेन चाचणी, सेमी-हाय-स्पीड कॉरिडॉर, तसेच बुलेट ट्रेन प्रकल्पात थेट सहभाग घेतला होता. सिंगापूर आणि मलेशिया येथे प्रगत व्यवस्थापन कार्यक्रम तसेच आयएसबी, हैदराबाद येथे धोरणात्मक व्यवस्थापन कार्यशाळेत त्यांनी सहभाग घेतला होता. विजय कुमार यांचे व्यक्तिमत्त्व शांत, सौम्य आणि संघटनक्षम होते. सहकाऱ्यांशी समन्वय राखून काम करणारा अधिकारी म्हणून त्यांचा आदर केला जात असे. त्यांच्या अचानक निधनाने रेल्वे प्रशासनात शोककळा पसरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.