मुलुंडमध्ये कोकण महोत्सवाला प्रारंभ
मुलुंड, ता. १२ (बातमीदार) : भारतीय जनता पक्ष आणि मुलुंड सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुलुंड येथे भव्य कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी (ता. १२) करण्यात आले. हा महोत्सव १२ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ६:०० ते रात्री १०:३० पर्यंत सुरू राहील. मुलुंड सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव मुलुंड पूर्वेतील मुलुंड तालुका क्रीडा संकुल, नीलमनगर फेज-२ या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
कोकणच्या संस्कृतीचा आस्वाद नागरिकांना घेता यावा, यासाठी या महोत्सवात शक्तीतुरा, होम मिनिस्टर, डबल बारी, कराओके, फॅशन शो, लोकगीते, जाकडी नृत्य, जादूचे प्रयोग अशा विविध मनोरंजनपर कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधीही मिळेल, असे आयोजक प्रकाश गंगाधरे यांनी सांगितले.