लोकल ट्रेनच्या डब्यांवर आक्षेपार्ह जाहिराती
कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचा आक्षेप
टिटवाळा, ता. १३ (वार्ताहर) ः मुंबई उपनगरी लोकल सेवेमधील सावळा गोंधळ, वेळापत्रकातील अनियमितता, तिकीट तपासणीतली शिथिलता आणि देखभाल व्यवस्थेतील ढिसाळपणा हे प्रश्न असतानाच आता मध्य रेल्वेच्या प्रशासनाने लोकल डब्यांवर आक्षेपार्ह जाहिराती लावण्याची मजल गाठली आहे. महसूल गोळा करण्याच्या नावाखाली रेल्वे प्रशासनाने नेमके कमरेचे गुंडाळून डोक्याला बांधले आहे का, असा संतप्त सवाल कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने थेट रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना ई-मेलद्वारे उपस्थित केला आहे.
कसारा स्थानकात बुधवारी दाखल झालेल्या कसारा-सीएसएमटी लोकलच्या पहिल्या डब्यात ही तथाकथित जाहिरात लावलेली दिसून आली. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या उपस्थितीत अशा प्रकारच्या चित्रांचे पोस्टर लावणे हे फक्त असंस्कृत नव्हे तर प्रवाशांच्या भावनांशी थेट खेळणारे कृत्य असल्याचा आरोप संघटनेच्या प्रतिनिधींनी केला आहे.
कसारा येथील संघटनेचे प्रतिनिधी युवराज पंडित यांनी पोस्टर पाहताच तत्काळ छायाचित्र काढून संघटनेचे सरचिटणीस आणि मध्य रेल्वे डीआरयूसीसी सदस्य श्याम उबाळे यांना पाठवले. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत उबाळे यांनी विभागीय व्यवस्थापक आणि वाणिज्य व्यवस्थापकांचे लक्ष वेधत तत्काळ नाराजी व्यक्त केली. उपनगरी लोकल रेल्वे ही दररोज लाखो प्रवाशांचा प्रवासमार्ग आहे. अशा ठिकाणी महसूल मिळावा म्हणून जाणीवपूर्वक अश्लील किंवा हिडीस जाहिराती लावणे हे प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे, असे श्याम उबाळे यांनी म्हटले.
लेखी तक्रार
या प्रकारात जो कोणी अधिकारी किंवा ठेकेदार दोषी असेल, त्याच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. जाहिराती लावण्यासाठी कोणत्या निकषांनुसार मंजुरी दिली जाते? अशा जाहिरातींवर कोणती तपासणी यंत्रणा आहे? हे सर्व प्रश्नही संघटनेने उभे केले असून, रेल्वेमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी रेल्वेमंत्री काय कारवाई करतात, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.