वाड्यात कुणबी समाजाचे प्राबल्य
वाडा, ता. १३ (बातमीदार) : सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजत आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षासह १७ प्रभागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, सध्या राजकीय पक्षांकडून योग्य उमेदवारांचा शोध सुरू आहे. नामनिर्देशन पत्र भरण्याची लगबग सुरू आहे. वाडा नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण घोषित झाले आहे. वाडा नगरपंचायत हद्दीत कुणबी समाजाचे प्राबल्य असल्याने सर्वच पक्षांकडून कुणबी समाजाच्या सक्षम उमेदवाराचा शोध सुरू असून, बरेच उमेदवार इच्छुक म्हणून पुढे येत आहेत.
वाडा नगर पंचायत हद्दीत कुणबी समाजाच्या खालोखाल आदिवासी, वैश्य वाणी, आगरी, दलित, भानुशाली, मराठा व इतर समाज घटकांचे मतदार आहेत. परंतु सर्व समाजांच्या तुलनेत कुणबी समाजाचे मताधिक्य अधिक आहे. मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये कुणबी समाजाच्या मतांचा प्रभाव वारंवार दिसून आल्याने नगराध्यक्ष पदासाठी सर्व पक्षांनी कुणबी समाजाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी कुणबी समाजातून जोर धरत आहे. त्यासाठी शहरात गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय पक्षांतील आणि सामाजिक संघटनांचे कुणबी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आपल्या समाजातील होतकरू, शिक्षित आणि प्रभावी महिला उमेदवाराला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळावी, अशी मागणी सुरू केली आहे.
पालघर जिल्ह्यात पेसा कायद्यामुळे नगर पंचायत वगळता इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जमातींसाठी सर्व प्रमुख पदे आरक्षित असल्याने बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजासाठी राजकीय संधी संपुष्टात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वाडा नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्याने कुणबी समाजासाठी ही एक महत्त्वाची राजकीय संधी म्हणून पाहिली जात आहे. यासाठी कुणबी समाजाच्या विविध संस्था व संघटनांच्या बैठका झडत आहेत. त्यातून कुणबी समाजालाच प्राधान्य मिळावे, अशी मागणी जोर धरत आहे.
समाजाच्या बैठका
१. पेसा कायद्यामुळे नगर पंचायत वगळता इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण मर्यादित असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२. नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव. त्यामुळे कुणबी समाजाची लोकसंख्या व मतदारसंख्या जास्त असल्याने वाडा नगर पंचायतमध्ये कुणबी समाजाला प्रतिनिधित्व मिळावे यासाठी कुणबी समाजाच्या बैठका.
३. कुणबी समाजातील होतकरू, शिक्षित आणि प्रभावी महिला उमेदवाराला संधी मिळावी अशी मागणी जोर धरते आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.