ठाण्यात मतदारसंख्येत विक्रमी वाढ
४ लाख २१ हजार मतदार ः महिलांची निर्णायक वाढ
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : नुकतेच ठाणे पालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर झाले आहे. त्यानंतर आता निवडणुकीच्या कामांच्या हालचालींना वेग आला आहे. अशातच ठाणे पालिका क्षेत्रात तब्बल चार लाख २१ हजार २५६ नवीन मतदारांची भर पडली आहे. नव्या मतदारांपैकी महिला मतदारांची वाढ सर्वाधिक असून, त्यांची संख्या तब्बल दोन लाख २४ हजार ७४३ ने वाढली आहे. त्यामुळे ठाणे पालिका क्षेत्रातील मतदारांची संख्या १६ लाख ४९ हजार ८६२ इतकी झाली आहे.
आगामी ठाणे पालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. पालिकेच्या निवडणूक विभागाकडून देखील कामाला वेग दिला असल्याचे दिसून येत आहे. अशातच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीचा आढावा घेतला असता, ठाणे पालिका क्षेत्रात तब्बल चार लाख २१ हजार २५६ नवीन मतदारांनी वाढल्याचे दिसून येत आहे.
२०११ च्या लोकसंख्येच्या (१८ लाख ४१ हजार ४८८) आधारावर प्रभागरचना करण्यात आली असून, त्यावेळचा जुना पॅटर्नच कायम ठेवण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात ठाण्याची लोकसंख्या आता २५ लाखांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये मतदारसंख्येत झालेली वाढ स्पष्टपणे जाणवत आहे. विशेषतः घोडबंदर, दिवा आणि नव्याने विकसित होणारे परिसर येथे गेल्या काही वर्षांत लोकसंख्येची झपाट्याने वाढ झाली आहे. नव्या गृहसंकुलांमुळे या भागांतील मतदारसंख्या झपाट्याने वाढत असून, काही प्रभाग आता ५५ ते ६० हजार मतदारांपर्यंत पोहोचले आहेत.
समीकरणात महत्वाची भूमिका बजावणार
चार सदस्यीय पॅनल पध्दतीत ही वाढलेली मतदारसंख्या निवडणुकीच्या समीकरणात महत्वाची भूमिका बजावणार आहे. वाढलेल्या मतदारांचा कल कोणत्या पक्षाच्या बाजूने झुकतो, हेच आगामी ठाणे महापालिका निवडणुकीतील सर्वात मोठे औत्सुक्य ठरणार आहे.
२०१७ च्या ठाणे महापालिका निवडणुकीत
एकूण मतदारसंख्या १२ लाख २८ हजार ६०६
पुरुष मतदार ६ लाख ६७ हजार ५०४,
महिला ५ लाख ६१ हजार ०८७
इतर १५
यावर्षीच्या आकडेवारीनुसार
एकूण १६ लाख ४९ हजार ८६२
पुरुष मतदारसंख्या ८ लाख ६३ हजार ८७४,
महिला ७ लाख ८५ हजार ८३०
इतर मतदार १५८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.