दीपक हिरे : सकाळ वृत्तसेवा
वज्रेश्वरी, ता. १३ : ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी येथे ‘जलजीवन मिशन’अंतर्गत राबविण्यात आलेल्या हर घर पाणी योजनेचा अक्षरशः बट्याबोळ झाला आहे. विविध कारणांमुळे काही ठिकाणी कामे ठप्प झाली आहेत. तीन कोटी २८ लाख ७१ हजार १०८ रुपयांची जलजीवन योजना गणेशपुरी ग्रामपंचायतीसाठी खर्च झाले आहे. तरी तब्बल अडीच वर्षे उलटूनही ग्रामस्थांच्या घरापर्यंत नळजोडणी पोहोचलेली नाही. परिणामी, येथील जनता पाण्यावाचून तहानलेली असून गणेशपुरीत पाणी टंचाई जाणवत आहे.
गणेशपुरीसारख्या धार्मिक स्थळात सध्या पाणीटंचाई जाणवत असून, नागरिकांना दररोज पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जलजीवन मिशन योजनेतील वाहिन्यांना पाणी नसल्याने आदिवासी लोकवस्तीत पाण्यासाठी आटापिटा करावा लागतो. गावातील जुन्या पाणीपुरवठा वाहिन्यांना गळती लागल्याने नागरिकांना पाणी प्यायला कमी आणि रस्त्यावर जास्त वाहून जात आहे. गावातील महिलांना भद्रकाली मंदिरासमोर व जिल्हा परिषद शाळेजवळील स्टँडपोस्टवर हंडाभर पाण्यासाठी रांगा लावाव्या लागतात. “नवीन योजना सुरू होणार तरी कधी?” असा संतप्त सवाल त्या व्यक्त करत आहेत.
या योजनेचे काम सरकारने ‘बुधराणी रंदनदास धरमोआय’ या कंपनीकडे दिले असून, उपठेकेदार म्हणून नीलेश पाटील यांची नियुक्ती केली होती. अडीच वर्ष उलटूनही कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे समोर आले आहे. गावात अनेक ठिकाणी वाहिन्या जमिनीवरच ठेवल्याने त्या उखडल्या आहेत. उसगाव येथील पंपहाऊस आणि स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरची दुरवस्था झाली आहे. या कामासाठी तीन कोटी २८ लाख ७१ हजार १०८ रुपयांचा निधी खर्च झाला आहे. सरकारकडूनही ७५ टक्के निधी घेतला गेला आहे. एवढा निधी खर्चूनही पाणीपुरवठा योजना सुरू झाली नाही.
ग्रुप ग्रामपंचायत गणेशपुरीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य, तसेच उद्धव ठाकरे गटाचे श्यामसुंदर जत्तन यांनी सांगितले की, योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून दोषींवर उच्चस्तरीय चौकशी करून कठोर कारवाई करावी. या संदर्भात गणेशपुरी पोलिस ठाण्यात उपठेकेदाराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
---
समस्या आणि कारणे
निधीचा अभाव : परिसरात काही ठिकाणी निधीअभावी योजना ठप्प आहेत.
आर्थिक समस्या : कामगारांना वेळेवर पगार मिळत नसल्याने कामावर परिणाम झाला आहे.
कामात विलंब : जिल्हा परिषदेच्या कामांच्या उद्दिष्टांमध्ये विलंब होत आहे.
इतर अडथळे : एकूण प्रगतीवर अनेक अडथळे येत असल्याने काही कामे रखडली आहेत.
परिणाम :
ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांना पिण्याच्या पाण्याच्या नळासाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे.
पाणीपुरवठा विभागाचे स्पष्टीकरण
ठाणे जिल्ह्यात जलजीवन मिशनची कामे वेगाने सुरू असल्याचा दावा केला जात असला तरी, प्रत्यक्षात कामांमध्ये अडथळे येत आहेत. सरकारकडून फक्त ७५ टक्के निधी प्राप्त झाला असून, निधीअभावी काही कामे रेंगाळली आहेत. निकृष्ट कामे झालेल्या ठिकाणी चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू आहेत, असे ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश सासे म्हणाले.
वज्रेश्वरी : उसगाव बंधारा येथील अपूर्ण अवस्थेत असलेले जलजीवन योजनेचे काम.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.