खोदलेल्या रस्त्यामुळे वाहतूक कोंडी
पादचाऱ्यांसह वाहनचालकांमध्ये नाराजी
वाशी, ता. २४ (बातमीदार) ः नवी मुंबईत पुन्हा एकदा खोदलेल्या रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळा संपताच शहरातील विविध नोड्समध्ये विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर रस्ते उखडण्यात आले असून, त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांचे हाल होत आहेत. मान्सूनपूर्व काळात खोदकामांवर बंदी असतानाही सध्या पाण्याच्या पाइपलाइन, महानगर गॅस लाइन, मलनिस्सारण वाहिन्या, भुयारी विद्युत वाहिन्या, काँक्रीटीकरण, तसेच गटार दुरुस्तीची कामे सुरू आहेत. परिणामी अनेक ठिकाणी रस्ते अपूर्ण अवस्थेतच सोडण्यात आले आहेत.
पनवेल, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, नेरूळ आदी नोड्समध्ये रस्ते खोदल्याने वाहतुकीचा खोळंबा वाढला आहे. दुचाकी आणि चारचाकी चालकांना दिवसभर ट्रॅफिक कोंडीत अडकून राहावे लागते. काही ठिकाणी काम सुरू असूनही ‘रस्ता बंद’ किंवा ‘काम सुरू आहे’ असे फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना पुढे जाऊन पुन्हा मागे वळावे लागते. विशेषतः घणसोलीतील पाम बीच रोड, आगरी चौक ते निरंकारी चौक आणि कोपरखैरणे-वाशी मार्गावरील रस्त्यांवर हे चित्र ठळकपणे दिसून येते. रस्त्यांची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना रोजचा प्रवास त्रासदायक बनला आहे. पादचारी मार्गांवर वाळू, सिमेंट आणि डेब्रिज पडल्याने पादचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी फुटपाथवर बांधकाम साहित्याचा ढीग असल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरूनच चालावे लागत आहे. त्यातच पावसाळ्यानंतर दुरुस्त न केलेल्या रस्त्यांमुळे मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. नागरिकांनी महापालिका, महावितरण आणि महानगर गॅस कंपनी यांच्यातील समन्वया अभावी ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला जात आहे. एका कामासाठी खोदलेले रस्ते पूर्ण बुजवले जाण्यापूर्वी दुसऱ्या विभागाकडून पुन्हा खोदकाम सुरू केले जाते. त्यामुळे रस्ते कायम अपूर्ण राहतात आणि प्रवास धोकादायक ठरतो.
..............
प्रशासनाकडून कारवाईचे आश्वासन
वाहनचालकांनी संताप व्यक्त करताना सांगितले की, रस्त्यांच्या कामांच्या ठिकाणी कोणतीही सूचना फलक किंवा मार्गदर्शन फलक नाहीत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. प्रशासनाने ठेकेदारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, नवी मुंबई महापालिकेचे शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी सांगितले की, रस्त्यांची कामे सुरू असलेल्या ठिकाणी ठेकेदारांना सूचना फलक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर ठेकेदारांनी फलक लावण्यात कुचराई केली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.