पनवेलमधील उड्डाणपुलांची सुरक्षा धोक्यात
न्यायालयाच्या आदेशांचा भंग; प्रशासनाचे डोळेझाक
नवीन पनवेल, ता. १३ (बातमीदार) : पनवेल शहर आणि परिसरातील उड्डाणपुलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने दिलेल्या स्पष्ट आदेशांना धाब्यावर बसवून पुलाखाली अनधिकृत पार्किंग, भंगार गोदामे, पोलिस चौक्या आणि भिकाऱ्यांची वस्ती वाढत आहे. या सर्व परिस्थितीमुळे पुलांची रचनात्मक स्थिरता तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीरपणे ऐरणीवर आला आहे.
२००८मध्ये उच्च न्यायालयाने पुलांखाली कोणत्याही प्रकारचे पार्किंग, व्यापारी वापर किंवा वास्तव्य करण्यास स्पष्ट मनाई केली होती. या आदेशानुसार, कोणत्याही पुलाखाली वाहन उभे करणे किंवा व्यावसायिक वापर करणे म्हणजे घातपाती कारवायांच्या दृष्टीनेही धोकादायक असल्याचे नमूद करण्यात आले होते. राज्य शासनानेही याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि एमएमआरडीएला आदेश जारी केले होते. या आदेशांची अंमलबजावणी प्रत्यक्षात होत नसल्याचे पनवेल परिसरातील वास्तव पाहता स्पष्ट होत आहे.
मिडल क्लास सोसायटी नाका परिसर, पनवेल बसस्थानक तसेच कळंबोली उड्डाणपुलाखाली अनेक ठिकाणी अनधिकृत पार्किंग आणि बांधकाम साहित्याचे ढीग दिसून येतात. काही ठिकाणी मिक्सर मशीन, भंगार गोदामे उभारण्यात आली असून, पुलाखाली भिकाऱ्यांनी झोपड्या टाकून कायमस्वरूपी वास्तव्य सुरू केले आहे. या ठिकाणी चुली पेटवून स्वयंपाक केला जातो. त्यामुळे धूर आणि उष्णतेमुळे पुलाच्या संरचनेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. याशिवाय अमरधाम स्मशानभूमीसमोरील उड्डाणपुलाखाली भंगार गोदामे सुरू असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेची स्थितीही बिघडत चालली आहे.
.................
कारवाई करण्याचे आश्वासन
सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ तसेच पनवेल महापालिका प्रशासन या सर्व संस्थांकडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. याबाबत रस्ते विकास महामंडळाचे अभियंता अजित पाटील यांनी प्रतिक्रिया देताना संबंधित जबाबदार विभागाची माहिती घेऊन आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे सांगितले. मात्र पनवेल महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त रविकिरण घोडके यांनी यासंदर्भात प्रतिसाद दिला नाही.
...................
खारघरमध्ये पोलिसांकडून नियमभंग
महामार्गावरील खारघर उड्डाणपुलाखाली वाहतूक पोलिसांची चौकी असून, जप्त केलेली वाहने याच पुलाखाली उभी केली जात आहेत. शेकडो वाहने बेवारस अवस्थेत पडल्याने आग लागल्यासह मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. त्याशिवाय घातपाती कारवाया करण्यासाठीही या वाहनांचा वापर होऊ शकतो, अशी नागरिकांनी भीती व्यक्त होत आहे. विडंबना म्हणजे नियम अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या पोलिसांनीच न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.