तोतया आरपीएफ अधिकारी जेरबंद
कल्याण लाेहमार्ग पाेलिसांची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : रेल्वे सुरक्षा दलाचा (आरपीएफ) गणवेश परिधान करून कल्याण रेल्वेस्थानकावर फिरणाऱ्या एका तरुणाला आरपीएफने बुधवारी पकडले. तपासात तो आरपीएफचा अधिकारी नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला लाेहमार्ग पाेलिसांकडे (जीआरपी) पुढील कारवाईसाठी सोपवण्यात आले. चौकशीत त्याने अविनाश राजाराम जाधव (२५, रा. इडा, भूम, उस्मानाबाद) असे नाव सांगितले.
कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. २/३ वर बुधवारी (ता. १३) दुपारी १२.३०च्या सुमारास ही कारवाई केली. आरपीएफ कल्याणचे सहाय्यक उपनिरीक्षक रमेशसिंह यादव गस्त घालत असताना एका तरुणाने आरपीएफचा सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) असल्याचे सांगून त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याची विनंती केली. यादव यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी अधिक चाैकशी केली. तेव्हा त्याने पुणे आरपीएफमध्ये पोस्टिंग असल्याचे सांगून वंदे भारत गाडीवर एस्कॉर्ट ड्युटीवर असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात काेणतेही एस्कॉर्ट कर्मचारी न दिसल्याने यादव यांनी कल्याण आरपीएफ पोस्टचे प्रभारी निरीक्षक रणजितसिंह यांना कळवले. संशयित तरुण पळण्याचा प्रयत्न करीत असताना आरपीएफचे हवालदार मंगेश थेरे, रितेश त्रिपाठी आणि सीआयबीचे कॉन्स्टेबल नीलकंठ गोरे यांनी पाठलाग करून त्याला पकडले.
चौकशीत त्याने अविनाश राजाराम जाधव असे आपले नाव सांगितले. त्याच्याकडे ओळखपत्र मागितल्यानंतर त्याचे बिंग फुटले. यानंतर त्याला कल्याण लाेहमार्ग पाेलिसांकडे सोपविण्यात आले. पंचासमक्ष त्याचा गणवेश आणि साहित्य जप्त करण्यात आले. सहाय्यक पाेलिस निरीक्षक रमेशसिंह यादव यांच्या तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
---------------
पोलिस वर्दीचे आकर्षण ठरले महागात
लोहमार्ग पोलिसांच्या चौकशीत अविनाश जाधव याचे शिक्षण एफवायबीएपर्यंत झाले असल्याचे उघड झाले. ताे एका हॉटेलमध्ये साफसफाईचे काम करीत होता. त्याचे आई-वडील गावी शेती करतात. लहानपणापासून त्याला पोलिस वर्दीचे आकर्षण आहे. या आकर्षणामुळेच ताे आरपीएफच्या वर्दीत स्थानकावर फिरताना सापडल्याने थेट तुरुंगात गेला आहे.
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.