शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कथाकथन स्पर्धा
ठाणे (बातमीदार) ः राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुग्धा चिटणीस घोडके कला सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि शारदा एज्युकेशन सोसायटीचे आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. १७) कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय आणि महाविद्यालयीन (कनिष्ठ-ज्येष्ठ) विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा सुम्म रघुनाथनगर, वागळे इस्टेट येथे होईल. विजेत्यांना रोख पारितोषिके आणि प्रशस्तिपत्रे देण्यात येणार आहेत. यासाठी १६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज पाठवण्याचे आवाहन केले आहे.
युवा महोत्सवामध्ये बांदोडकर महाविद्यालयाचे यश
ठाणे (बातमीदार) : विद्या प्रसारक मंडळाचे बा. ना. बांदोडकर स्वायत्त विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवा महोत्सव २०२५ या जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या ‘विंडस्टिच’ विज्ञान प्रकल्पाला द्वितीय क्रमांक मिळाला. प्रकल्पातील प्रमुख विद्यार्थी मकरंद जरांग, लावण्या दळवी आणि स्वरा माळी आहेत. महाविद्यालयाच्या स्वरांगना लोकगीत गटानेही लोकगीत स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांमध्ये खुशी डगवार, प्रज्ञा कदम, श्रेया देवरुखकर, मेघना जंगम आणि प्रगती चौगुले आहेत. कार्यक्रमाचे आयोजन बिपिन धुमाळे व मनीषा मानकर यांनी केले, तर प्राचार्या डॉ. विंदा मांजरमकर, उपप्राचार्या डॉ. प्रीती जांभूळकर आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले.
गुंतवणूक मार्गदर्शनासाठी ठाण्यात व्याख्यान
ठाणे (बातमीदार) : ग्राहक पंचायतीच्या वतीने गुंतवणूकविषयक व्याख्यान आयोजित केले आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध अर्थ अभ्यासक उदय पिंगळे हे गुंतवणूक का करावी, कधी करावी, कोठे करावी आणि कशी करावी या विषयावर मार्गदर्शन करतील. व्याख्यान शुक्रवारी (ता. १४) सायंकाळी ४ वाजता विश्रांती बंगला, वसंत सभागृह डॉ. बेडेकर हॉस्पिटलसमोर होईल. गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची सखोल माहिती घेण्याची ही सुवर्णसंधी आहे. सर्वांना या व्याख्यानास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
४. ‘करिअर कट्टा’ कार्यक्रमात लष्करी करिअर मार्गदर्शन
ठाणे (बातमीदार) : मराठी ग्रंथ संग्रहालय यांच्या वतीने करिअर कट्टा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात निवृत्त लष्कर अधिकारी मेजर मोहिनी गर्गे सैन्य दलातील विविध क्षेत्रांबाबत मार्गदर्शन करतील. विद्यार्थ्यांना आणि इच्छुकांसाठी सैन्य करिअरच्या संधी, तयारीचे मार्गदर्शन आणि अनुभव शेअर केले जातील. कार्यक्रम शनिवारी (ता. १५) सायंकाळी ५.३० वाजता मराठी ग्रंथ संग्रहालय येथे होईल. अधिक माहितीसाठी ९८२०७७५५७० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना करिअरची स्पष्ट दिशा मिळेल.
५. ठाण्यात ‘साज-ए-गझल’ कार्यक्रम
ठाणे (बातमीदार) : नाट्यझंकार प्रॉडक्शन्सच्या वतीने ‘साज-ए-गझल’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हिंदी आणि मराठी गझलांचा हृदयस्पर्शी अनुभव दिला जाणार आहे. हा कार्यक्रम शनिवारी (ता. १५) ८.३० वाजता गडकरी रंगायतन येथे होईल. गझलगायक निनाद आजगांवकर, दत्तप्रसाद रानडे आणि गायिका संगीता मेळेकर आपल्या मधुर आवाजात गझलांचा मोहक अनुभव सादर करतील. निवेदनाची धुरा अभिजित खांडकेकर आणि चेतना भट यांनी सांभाळली आहे. संगीत आणि शब्दांची जादू अनुभवण्यासाठी हा कार्यक्रम गझलप्रेमींकरिता विशेष ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.