ठाण्यात केळकर चमत्कार घडवतील
गणेश नाईकांचा विश्वास ः वादाच्या पार्श्वभूमीवर वनमंत्र्यांचे सूचक वक्तव्य
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील राजकीय समीकरणे अधिक ताणली जात असताना वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा सूचक विधान करत शिंदे सेनेला इशारा दिला आहे. ठाण्यात आमदार संजय केळकर चमत्कार घडवतील, असा विश्वास वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.
वर्तक नगर येथील ‘प्रती शिर्डी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साईबाबा मंदिराच्या वर्धापनदिन सोहळ्यात उपस्थित राहून गणेश नाईक यांनी दर्शन घेतले. या वेळी ठाणेकरांच्या समस्या आणि हालअपेष्टा दूर व्हाव्यात, अशी प्रार्थना त्यांनी केली. त्याच वेळी महापालिका निवडणुकीत भाजपकडून विजयाची शक्यता व्यक्त करत केळकर ठाण्यात चमत्कार घडवतील, असे विधान करून त्यांनी चर्चेला तोंड फोडले. राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीने एकत्र निवडणुकीचा नारा दिला असला तरी ठाण्यात मात्र शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे.
महापौरपदावरून वार-पलटवार
महापौरपदावर दोन्ही पक्षांनी दावे केल्याने तणाव वाढला आहे. अलीकडे संजय केळकर यांनी ठाण्याचा महापौर भाजपचाच झाला पाहिजे, असे ठाम मत व्यक्त केले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना नरेश म्हस्के यांनी महापौर कोणाचा होणार हे जनता ठरवेल, असे सांगत भाजपवर पलटवार केला होता. दरम्यान, भाजप शहराध्यक्ष संदीप लेले यांनी संख्याबळाच्या आधारावर महापौर भाजपचाच ठरेल, असा दावा केला होता. दरम्यान, युतीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जातील, मात्र कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, याची काळजी घेतली जाईल, असेही नाईक यांनी स्पष्ट केले.