क्षणभराचा राग आणि मृत्यूवर शेवट
कधी कधी जीवनातील छोट्या घटना जसे की एखादा धक्का, एक तिखट शब्द अनपेक्षित राग आणि हिंसाचाराला जन्म देतात. डोंबिवलीतील एका हॉटेलसमोर घडलेली ही घटना तशीच आहे. धक्का लागल्याच्या कारणावरून सुरू झालेला गदारोळ काही क्षणांत रक्तरंजित हत्येत बदलला आणि एका तरुणाचे आयुष्य संपले. या घटनाक्रमातून केवळ एका कुटुंबातच नव्हे, तर संपूर्ण समाजातच खळबळ माजली. एक अशी घटना जिथे भावनांवरचा ताबा सुटला आणि क्षुल्लक वादाने प्राणघातक वळण घेतले आणि मग सुरू झाला पोलिसांचा ‘पाठलाग’.
संतोष दिवाडकर, कल्याण
रात्रीचा अंधुक प्रकाश आणि डोंबिवलीतील मालवण किनारा हॉटेलच्या बाहेर थंड वारा खेळत होता. रविवारची रात्र होती. आकाश सिंह आणि त्याचे काही मित्र जेवणासाठी हॉटेलमध्ये आले होते. शहरातील गोंगाट आणि दिवसभराचा थकवा मागे टाकत ते गप्पा मारत होते, पण केवळ एका क्षणात संपूर्ण वातावरण हिंसाचाराच्या सावलीत गेले. हॉटेलच्या दारावर त्याला अनोळखी तरुणाचा धक्का लागला. किरकोळ वाटणारी घटना, पण त्या क्षुल्लक धक्क्यातूनच वादाची मोठी ठिणगी पेटली. सुरुवातीला शाब्दिक चकमक, त्यानंतर एकमेकांना शिवीगाळ, पुढे धक्काबुक्की. पाहता पाहता राग अनावर झालेले ते अनोळखी पाच ते सहा तरुण आकाशवर तुटून पडले.
हॉटेलसमोर बघ्यांची गर्दी झाली, पण थांबविण्याची हिंमत कुणालाही होईना. याच गोंधळात एका तरुणाने धारदार चाकू काढला आणि क्षणभरात आकाशच्या छातीवर त्याने वार केला. त्याच्या चेहऱ्यावर वेदनेचा आक्रोश उमटला आणि काही सेकंदात त्याचे शरीर निश्चल झाले. आकाश रक्ताच्या थारोळ्यात पडताच घटनास्थळी गोंधळ माजला. आकाशचेही मित्र घाबरून मदतीसाठी आरडाओरडा करीत होते. याचदरम्यान आरोपींनी घटनास्थळाहून पळ काढला.
घडलेल्या घटनेची माहिती मानपाडा पोलिसांना मिळताच अधिकारी ते घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी पंचनामा सुरू केला. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदिपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहिम सुरू झाली. गुन्हेगारांच्या हालचालींचे तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कसून तपास चालवला. या तपासात हे आरोपी नाशिकच्या दिशेने गेले असल्याची माहिती पोलिसांकडे प्राप्त झाली आणि सुरू झाला ‘पाठलाग’.
स्थानिक पोलिसांच्या मदतीने अमर महाजन, अक्षयकुमार वागळे, अतुल कांबळे, नीलेश ठोसर, प्रतिकसिंह चौहान आणि लोकेश चौधरी या सहा आरोपींना अटक करीत मानपाडा पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला. या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास पोलिस निरीक्षक जयपालसिंह राजपूत करीत आहेत. मारेकऱ्यांना अटक झाली असली तरी आकाशच्या कुटुंबावर मात्र दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. एका क्षणिक वादाचा शेवट एका तरुणाच्या मृत्यूने झाला. या घटनेने डोंबिवली शहराने पुन्हा एकदा विवेकहीन रागाचे भयावह रूप पाहिले.
४८ तासांच्या मोहिमेनंतर आरोपी जाळ्यात
तांत्रिक माहिती आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक थेट नाशिकला गेले. नव्या शहरात आरोपींचा शोध घेणे म्हणजे गवतातून सुई शोधून काढण्यासारखेच. अशावेळी तेथील स्थानिक यंत्रणेची मदत महत्त्वाची ठरली. त्याच अनुषंगाने नाशिक, मालेगाव आणि चाळीसगाव अशा ठिकाणच्या पोलिस पथकांनी संयुक्त शोधमोहिमा राबवल्या. अखेर ४८ तासांच्या अखंड प्रयत्नांनंतर हत्या प्रकरणातील गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकलेच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.