मुरबाडमधील राजकीय समीकरणे बदलणार
सुभाष पवारांच्या प्रवेशामुळे भाजपला बळ
मुरबाड, ता. १७ (बातमीदार) : ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी गुरुवारी (ता. १३) भाजपमध्ये प्रवेश केल्याने मुरबाड तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. पवार यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपला एकहाती सत्ता मिळण्याची संधी निर्माण झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सुभाष पवार यांनी मागील विधानसभा निवडणुकीत आमदार किसन कथोरे यांच्याविरोधात निवडणूक लढवून तब्बल एक लाख २३ हजार मते मिळवली होती. कथोरे यांना शह देण्याची ताकद असलेला वजनदार नेता म्हणून त्यांची ओळख आहे. पवार यांच्या पाठीमागे त्यांचे वडील, माजी आमदार गोटीराम पवार यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यांच्या प्रवेशामुळे मुरबाडमध्ये भाजप वगळता इतर पक्षांना आपला उमेदवार निवडून आणणे सहजासहजी शक्य होणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
अंतर्गत दुरावा कमी होणार
भाजपमधील दोन मोठे नेते, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यामध्ये असलेला अंतर्गत दुरावा सुभाष पवार यांच्यामुळे कमी होईल, असा राजकीय अंदाज आहे. पवार हे या दोन नेत्यांमध्ये ‘मधला दुवा’ म्हणून काम करतील, अशी कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये आहे.
ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीवर परिणाम
पवार यांच्या भाजप प्रवेशामुळे ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असलेले भाजप कार्यकर्ते तसेच सुभाष पवार यांचे समर्थक आनंदी आहेत. त्यांना आता तिकीट मिळाल्यास आपला विजय निश्चित आहे, अशी खात्री वाटत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकीट कापले जाऊ नये, म्हणून सर्व इच्छुक नेते आता आपली ‘तलवार म्यान’ करून पक्ष सांगेल ती पूर्व दिशा या भूमिकेत राहण्याची शक्यता आहे.
युती झाल्यास विरोधक अडचणीत
राजकीय घडामोडींदरम्यान भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेले शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपसोबत युती केल्यास त्यांचे उमेदवार विनासायास निवडून येण्याची शक्यता आहे. याउलट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष यांच्या युतीला भोपळा फोडता येईल की नाही, याबद्दल राजकीय नेत्यांनी शंका व्यक्त केली आहे.