उल्हासनगर, ता. १७ (वार्ताहर) : उल्हासनगरमध्ये गुन्हेगारांच्या टोळीगिरीला चाप लावण्यासाठी पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी मोठी कारवाई करत एका गंभीर गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) लावण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यवर्ती पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यामधील आरोपींच्या वाढत्या बेकायदा कारवाया, आर्थिक फायदा मिळवण्यासाठी राबवलेला गुन्हेगारी रॅकेट आणि टोळी सदस्यांची धमक यामुळे प्रकरण अधिक गंभीर झाले आहे. अखेर वरिष्ठ पातळीवरून मकोका लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उल्हासनगर शहरातील वाढत्या टोळीगिरीला आळा घालण्यासाठी मध्यवर्ती पोलिस ठाणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महत्त्वाची पावले उचलली आहेत. सुरुवातीला ६ सप्टेंबरला गुन्हा दाखल केला होता. मात्र, तपासादरम्यान टोळीप्रमुख हरविंदर ऊर्फ चिंकू अजयसिंग लबाना आणि सदस्य हरदीप ऊर्फ हनी अजयसिंग लबाना, यश ऊर्फ गोलू विषाल जजवंशी व अनिकेत राजेश कुरील यांनी सतत बेकायदा मार्गाने गुन्हेगारी कारवाया केल्याचे उघडकीस आले. या टोळीच्या वाढत्या दहशतीवर नियंत्रण आणण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपास अहवालाचा अभ्यास करून या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ (मकोका) लागू करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार कडक तरतुदी ५ नोव्हेंबरला गुन्ह्यात सामाविष्ट करण्यात आल्या. त्यानंतर प्रकरणाचा तपास अधिक सखोल आणि प्रभावी पद्धतीने होण्यासाठी संपूर्ण गुन्हा उल्हासनगरचे सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
उल्हासनगरमध्ये वाढणाऱ्या संघटित गुन्हेगारीला आता कोणतीही सूट दिली जाणार नाही. या प्रकरणातील आरोपी आर्थिक फायदा करून घेणारे आणि समाजात दहशत निर्माण करणारे आहेत. पुराव्यांवरून त्यांच्यावर मकोका लागू करण्याचा निर्णय आवश्यक होता. शहरातील शांतता, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कायद्यावर विश्वास ठेवावा; कोणत्याही बेकायदा घटकांना येथे जागा दिली जाणार नाही.
- सचिन गोरे, पोलिस उपायुक्त, उल्हासनगर