भाईंदर, ता. १७ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहनच्या ताफ्यातील बस मोठ्या संख्येने नादुरुस्त असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते. याप्रकरणी महापालिका प्रशासनाने कंत्राटदाराला निर्वाणीचा इशारा दिला आहे. वारंवार नोटिसा बजावण्यात आल्यानंतरही कार्यपद्धतीत सुधारणा होत नसल्याने व करारातील अटींचा भंग होत असल्याने करारनामा रद्द का करण्यात येऊ नये, याचा खुलासा १५ दिवसांत करावा अन्यथा करार रद्द करण्यात येईल, अशी अंतिम नोटीस महापालिकेने कंत्राटदाराला बजावली आहे.
परिवहन सेवेच्या ताफ्यात डिझेलवरील ७४ बस असून, त्या कंत्राटदाराच्या माध्यमातून चालविण्यात येतात, परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यातील तब्बल ३३ बस आगारातच उभ्या आहेत. या बसची देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने त्या नादुरुस्त झाल्या आहेत. परिणामी विविध मार्गांवर आवश्यकतेपेक्षा कमी बस धावत असून, त्याचा प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. यासंबंधी सविस्तर वृत्त ‘सकाळ’ने याआधी प्रसिद्ध केले होते. बस नादुरुस्त असल्यामुळे कंत्राटदाराला वारंवार नोटिसा बजावण्यात आल्या; मात्र त्यानंतरही या बस दुरुस्त झाल्या नाहीत. परिणामी महापालिकेने कंत्राटदाराला अंतिम नोटीस बजावली आहे.
डिझेलवर चालणाऱ्या बसची वेळोवेळी देखभाल-दुरुस्ती करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे, मात्र ही जबाबदारी पार पडत नसल्याने बस टप्प्याटप्प्याने आगारात उभ्या राहू लागल्या. सध्या आगारात उभ्या असलेल्या बसची संख्या ३३ झाली आहे. ७५ पैकी ६९ बस रस्त्यावर धावणे अपेक्षित आहे, मात्र त्यानुसार बस धावत नसल्याने जेवढ्या बस कमी आहेत. त्याप्रमाणे प्रति बस प्रतिदिन एक हजारांचा दंड महापालिकेने आकारायला सुरुवात केली व कंत्राटदाराला बसची देखभाल-दुरुस्ती करून घेण्यासाठी मुदत दिली. ही दुरुस्ती न झाल्यास करारनाम्यातील अटीनुसार करार रद्द करण्यात येईल, असेही महापालिका प्रशासनाने कंत्राटदाराला बजावले.
महापालिकेच्या उत्पन्नात घट
बस रस्त्यावर कमी धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याची, त्याचप्रमाणे महापालिकेचे उत्पन्न घटत असल्याची जाणिवदेखील कंत्राटदाराला करून देण्यात आली. महापालिकेच्या ताफ्यात पाच वातानुकुलित बस आहेत, मात्र त्या बसदेखील बंद असल्याने कंत्राटदाराने साध्या बस उपलब्ध केल्या. या सर्व बाबींमुळे महापालिकेच्या परिवहन सेवेचा दर्जा घसरला असून, महापालिकेची प्रतिमा मलिन होत आहे, असे प्रशासनाने कंत्राटदाराला बजावलेल्या नोटिशीत नमूद केले आहे.
२६ नोव्हेंबरपर्यंत मुदत
वारंवार नोटिसा बजावल्यानंतरही सुधारणा होत नसल्याने तसेच कंत्राटदारासोबत केलेल्या कररानाम्याचा भंग होत असल्याने करारनामा रद्द का करण्यात येऊ नये, याचा खुलासा १५ दिवसांत करावा अन्यथा करार रद्द केला जाईल, असा अंतिम इशारा महापालिकेने कंत्राटदाराला दिला आहे. येत्या २६ नोव्हेंबरला या नोटिशीची मुदत संपुष्टात येत आहे.