पडघा, ता. १७ (बातमीदार) : सरकारच्या कर्जमाफी घोषणेमुळे भिवंडी तालुक्यातील शेतकरी सहकारी संस्थांच्या आर्थिक संरचनेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. कुरुंद ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत हा निष्कर्ष काढण्यात आला.
कुरुंद सोसायटीचे सभापती भगवान सांबरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतसंस्था यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहील, अशी भीती यावेळी व्यक्त केली.
बँकेचे कर्ज माफ झाले तरी सरकारकडून संबंधित सहकारी संस्थांना माफ केलेल्या कर्जाची रक्कम तातडीने आणि पूर्णपणे मिळणे अत्यावश्यक आहे. निधी उशिरा किंवा अपुरा मिळाल्यास संस्थांचे खेळते भांडवल कोलमडते, त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बिकट होते, असे बैठकीत सांगितले. कर्जमाफीच्या घोषणेनंतर वसुली पूर्णपणे थांबते. शेतकरी कर्जफेड मंदावतात, परिणामी सहकारी संस्थांची वसुली थंडावते आणि बँकांची वन टाइम सेटलमेंट योजनाही अडचणीत येते. खेळते भांडवल घटल्याने नवीन पीककर्ज देणेही मुश्किल होते. त्यामुळे पुढील हंगामात शेतकऱ्यांना सावकारांकडून जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागण्याची वेळ येऊ शकते, अशी चिंता बैठकीत व्यक्त झाली.
भिवंडी तालुक्यातील सर्व सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी लवकरच माजी आमदार बच्चू कडू यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन देणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
पूर्ण रक्कम एकाच हप्त्यात द्या!
बैठकीत कर्जमाफीच्या धोरणाचा सहकारी संस्थांवर होणारा थेट आणि गंभीर परिणाम तपासण्यात आला. या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकारने कर्जमाफीची पूर्ण रक्कम एकाच हप्त्यात आणि तातडीने देण्याची मागणी करण्यात आली. हे केल्यास संस्थांचे खेळते भांडवल वाढेल आणि शेतकऱ्यांना नव्या हंगामात वेळेवर कर्ज वितरण करणे शक्य होईल, असे मत व्यक्त झाले.