भास-आभासाचा ‘असंभव’ थरार!
-----------
मुलाखत : सचित पाटील
---------
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता व दिग्दर्शक सचित पाटील आता ‘असंभव’ हा चित्रपट घेऊन येत आहे. रहस्य आणि गूढ यांनी भरलेला हा चित्रपट येत्या शुक्रवारी (ता. २१) प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन सचितनेच केले असून, मुख्य भूमिकाही त्यानेच साकारली आहे. निर्मिती सचित आणि नितीन वैद्य यांनी मिळून केली आहे. मुक्ता बर्वे, प्रिया बापट, संदीप कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, मंगेश परुळेकर आणि संजय पोतदार हे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता सचित पाटील याच्याशी केलेली बातचीत...
----------
तुझ्या आजवरच्या करिअरविषयी काय सांगशील?
- लहानपणापासून अभिनय आणि वाचनाची आवड असल्यामुळे रंगभूमी निवडली. सुधा करमरकर आणि सुलभा देशपांडे यांच्या बालनाट्य शिबिरांमध्ये सहभागी झालो. नंतर सांस्कृतिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या रुपारेल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, जिथे माझी चेतन दातार या गुरूंशी भेट झाली आणि आदेश बांदेकर, कौशल इनामदार, अजित परब, सुचित्रा बांदेकर आणि माझी पत्नी शिल्पा पै यांसारख्या अनेक कलाकारांशी ओळख वाढली. गुरूंनी कार्यशाळेसाठी पाठवल्यावर पंडित सत्यदेव दुबे यांची भेट झाली आणि त्यांच्या ‘आधे अधुरे’ या नाटकातून पहिली मोठी संधी मिळाली. त्यानंतर अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं, हिंदी चित्रपटांतून अनुभव घेतला आणि मराठी चित्रपटसृष्टीत ‘सत्तेसाठी काहीही’मधून पदार्पण केले. पुढे २००६मध्ये ‘साडेमाडे तीन’चे दिग्दर्शन, ‘क्षणभर विश्रांती’चे लेखन व अभिनय केला आणि ‘झेंडा’पासून ‘राधा प्रेम रंगी रंगली’पर्यंत हा प्रवास सुरूच राहिला. आज या जवळपास ३० वर्षांच्या प्रवासात खूप काही शिकायला मिळालं.
‘असंभव’ या चित्रपटाची संकल्पना काय आहे?
- ही कथा पुनर्जन्मावर आधारित आहे. मानसी नावाची मुलगी व्यावसायिक वास्तुविशारद असून, तिला लहानपणापासून एक भीषण स्वप्न वारंवार पडतं, ज्यात कोणीतरी तिचाच खून करताना दिसतं. दुसरीकडे आदित्य देशमुख हा भारतातील प्रमुख तरुण उद्योजक असून, उत्तराखंड सरकार त्याला भव्य क्रीडांगण उभारण्याची जबाबदारी देते आणि या कामासाठी त्याची मानसीशी भेट होते. या प्रकल्पाच्या निमित्ताने ते दोघं एका जुन्या हवेलीत पोहोचतात आणि ती हवेली पाहताच मानसीला पुन्हा तेच भास व स्वप्नं सतावू लागतात. त्यातून पुढे हळूहळू उलगडत जातं की याच हवेलीत तिचा मागच्या जन्मात खून झाला होता आणि त्यानंतर संपूर्ण कथेला नवं रहस्यमय वळण मिळतं.
यात तुझी भूमिका काय आहे?
- मी आदित्य देशमुखची भूमिका साकारली आहे, तर मुक्ता बर्वे मानसीची भूमिका साकारत आहे. या कथेत आम्हा दोघांचीही दुहेरी भूमिका असून, वर्तमान आयुष्याबरोबरच पूर्वजन्मातील व्यक्तिरेखाही आम्ही साकारल्या आहेत.
दिग्दर्शक म्हणून काम करण्याचा अनुभव कसा होता?
- अनुभव खूप सुंदर आणि समृद्ध करणारा होता. दिग्दर्शनासोबत पटकथा मी स्वतः लिहिली असून, अभिनयसुद्धा केला आहे. निर्मितीमध्येही माझी महत्त्वाची भूमिका आहे. नितीन प्रकाश वैद्य आणि मी मिळून हा चित्रपट निर्माण केला आहे. तसेच शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, मंगेश परुळेकर आणि संजय पोतदार हे सहनिर्माते म्हणून जोडले गेले आहेत. कलाकारांमध्ये प्रिया बापट आणि अभिनेते संदीप कुलकर्णी यांचाही सहभाग असून, सर्वांच्या सहकार्यामुळे हा प्रवास अत्यंत आनंददायी ठरला.
भूमिकेसाठी तुला कोणती विशेष तयारी करावी लागली?
- ही कथा कपिल भोपटकर यांची असून, ती ऐकताच ती मोठ्या पडद्यावर आणण्याचा निर्णय मी घेतला. आम्ही जवळपास दोन वर्षं पटकथा लेखनात गुंतलेलो होतो. सततच्या चर्चेमुळे कथा मनात इतकी भिनली की अभिनयासाठी वेगळ्या तयारीची गरज भासली नाही; मात्र आदित्य देशमुखच्या दुहेरी भूमिकेमुळे दोन्ही व्यक्तिरेखांमध्ये फरक दाखवण्याचा थोडा अभ्यास करावा लागला. मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी यांसारख्या अनुभवी आणि संवेदनशील कलाकारांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना व्यक्तिरेखांबद्दल फारसे सांगण्याची गरजच भासली नाही. त्यांनी पटकथा वाचूनच भूमिकेचा आत्मा समजून घेतला.
चित्रीकरणादरम्यान काही आव्हाने होती?
- आव्हानांच्या दृष्टीने फार काही अडचणी नव्हत्या. चित्रपटाचा अर्ध्याहून अधिक भाग नैनितालमध्ये शूट करण्यात आला आणि तिथलं वातावरण आमच्यासाठी सर्वात मोठी परीक्षा ठरले. दिवसा तापमान सहा-सात अंशांदरम्यान असायचं. रात्री ते पाच-सहापर्यंत खाली जायचं. अशा कडाक्याच्या थंडीत चालणंदेखील जीवावर यायचं आणि संपूर्ण युनिट अक्षरशः थंडीने थरथरत काम करीत होतं. मात्र संपूर्ण टीमची साथ, प्रत्येक कलाकाराची निष्ठा आणि मेहनत यामुळेच ‘असंभव’ हा चित्रपट शक्य झाला.
- स्वस्तिका नाटेकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.