भाजपचा ज्येष्ठ नेता ‘कलानी’कडे
संतप्त कार्यकर्त्यांकडून फोटोला शाई फासून निषेध
उल्हासनगर, ता. १९ (वार्ताहर) : भाजपचे माजी ज्येष्ठ नेते महेश सुखरामानी यांनी पक्षत्याग करून थेट टीम ओमी कलानीचा झेंडा हाती घेतल्याने संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हा कार्यालयात त्यांच्या फोटोंवर काळी शाई फासून निषेध नोंदवला. अनेक वर्षे पक्षाला दिलेल्या सेवेनंतर अचानक झालेले हे धोरणात्मक वळण भाजप कार्यकर्त्यांना पचनी पडत नसल्याने त्याचीच ठिणगी भाजप कार्यालयात भडकताना पाहायला मिळाली.
उल्हासनगर शहराच्या राजकीय वातावरणात मोठा भूकंप घडवणाऱ्या महेश सुखरामानी यांच्या पक्षत्यागानंतर भाजप जिल्हा कार्यालयात संतापाचे वादळ उठले. भाजपमधील अनुभवी, प्रतिष्ठित आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या महेश सुखरामानी यांनी अचानक पक्ष सोडून टीम ओमी कलानीत प्रवेश केला. या निर्णयामुळे भाजपच्या स्थानिक पातळीवर तीव्र नाराजी उसळली असून, कार्यकर्त्यांमध्ये जोरदार असंतोष निर्माण झाला आहे.
भाजपच्या यूटीए या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपक छतलानी यांच्या नेतृत्वाखाली अनेक भाजप कार्यकर्ते कार्यालयात जमले. कार्यालयात अनेक वर्षांपासून लावण्यात आलेल्या महेश सुखरामानी यांच्या फोटोंवर संतप्त कार्यकर्त्यांनी काळी शाई फासली. नाराज कार्यकर्त्यांनी “हा गद्दार निवडून येणार नाही!” अशा जोरदार घोषणा देत त्यांच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.
राजकीय समीकरणांवर थेट परिणाम
भाजप सोडून टीम ओमी कलानीत जाण्याच्या महेश सुखरामानी यांच्या निर्णयामुळे भाजपला धक्का बसला असून, शहरातील आगामी राजकीय समीकरणांवर याचा थेट परिणाम होणार असल्याचे मानले जात आहे. कार्यकर्त्यांच्या रोषातून या निर्णयाचा किती खोलवर परिणाम झाला आहे, हे आज स्पष्टपणे दिसून आले. उल्हासनगरच्या आगामी राजकीय घडामोडींवर यानंतर सर्वांचे बारकाईने लक्ष लागले आहे.