वाहतूक दीड तास ठप्प
मुंबई-नाशिक महामार्गावर अपघात
ठाणे, ता. १९ : मुंबई-नाशिक महामार्गावर बुधवारी (ता. १९) सकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या अपघातामुळे नाशिककडून मुंबईकडे जाणारी वाहतूक दीड तास धीम्या गतीने सुरू होती. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कुर्ला येथून ठाण्याकडे येणाऱ्या एका जनरेटर व्हॅनला माजीवाडा ब्रिजजवळ भरधाव वेगाने आलेल्या एका अनोळखी कंटेनरने जोरदार धडक दिली. कंटेनरच्या धडकेमुळे जनरेटर व्हॅन नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर आली आणि तिने ठाणे महापालिकेच्या घंटागाडीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, व्हॅनचे ऑइल रस्त्यावर सांडले.
दक्ष नागरिक दिनेश प्रजापती यांनी तातडीने ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वाहतूक पोलिस, ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि घनकचरा विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. एक हायड्रा मशीन आणि एक टोविंग वाहनाच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली.
रस्त्यावर सांडलेल्या ऑइलवर कर्मचाऱ्यांनी माती पसरवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला, त्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली. या अपघातामुळे नाशिककडून मुंबईकडे जाणारी वाहतूक दीड तास कासवगतीने सुरू होती, अशी माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.