मोखाड्यात बीएसएनएल सेवेचा लपंडाव
ग्रामीण भागातील ग्राहकांना ‘नो नेटवर्क’चे गाजर!
मोखाडा. ता. १९ (बातमीदार) : मोखाडा तालुक्यातील आदिवासी भागात भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) ‘नो नेटवर्क’ समस्येमुळे ग्राहकवर्ग कमालीचा त्रस्त झाला आहे. खासगी कंपन्यांकडे वळलेल्या ग्राहकांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी बीएसएनएलने मौजे सायदे, कोचाळे, सूर्यमाळ, सावर्डे, करोळ, कारेगाव, काष्टी, आमला या आठ ठिकाणी नवीन टॉवर्स उभे केले, पण यानंतरही दुरध्वनी सेवेत काडीमात्र सुधारणा झालेली नाही.
तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट सेवा अत्यावश्यक असताना, बीएसएनएलची नेटवर्क सेवा सातत्याने खंडित होत असल्याने असंख्य ग्राहकांना फटका बसत आहे. मागील दोन वर्षांपासून नेटवर्क दीर्घकाळ गायब होण्याचे प्रकार वाढत आहेत. या अनियमित सेवेमुळे बीएसएनएलचे उत्कृष्ट सेवा देण्याचे दावे फोल ठरले आहेत.
आठ ठिकाणी टॉवर उभारूनही नेटवर्कमध्ये सुधारणा नाही. सलग १५-१५ दिवस नेटवर्क गायब राहणे, सेवेतील विस्कळीतपणा याबाबत तक्रारी करूनही वरिष्ठ स्तरावरून अपेक्षित प्रतिसाद नाही. अशा दुर्लक्षामुळे ग्राहक नाइलाजाने जिओ, एअरटेल, व्होडाफोन यांसारख्या खासगी कंपन्यांकडे वळत आहेत. बीएसएनएल अप्रत्यक्षपणे या कंपन्यांना त्यांचा विस्तार करण्यास मदत करीत असल्याचा आरोप संतप्त ग्राहकांनी केला आहे. याबाबत संबंधित कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण होऊ शकला नाही.
--------
आमच्या सावर्डे गावात बीएसएनएलने टॉवर टाकले आहेत. सेवा सुरळीत सुरू राहावी म्हणून त्यासाठी आम्हीही सहकार्य केले आहे. परंतु बीएसएनएलची दुरध्वनी सेवा ही अक्षरशः मोडकळीस आल्याचे चिन्ह ग्रामीण भागात दिसून येत आहे. वास्तविकतः ग्रामीण भागात कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने किमान संपर्क साधणे आवश्यक असल्याने भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन निरनिराळ्या आठ ठिकाणी टॉवर बसवण्यासाठी योग्य ते सहकार्य केलेले आहे, परंतु बीएसएनएलचे शेपूट काही सरळ होत नाही.
- हनुमंत पादीर, उपसरपंच, सावर्डे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.