माता रमाबाई आंबेडकरनगरात घरफोड्यांचे सत्र
घाटकोपर, ता. १९ (बातमीदार) ः घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकरनगरात गेल्या दोन वर्षांत घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. २७ मे २०२३ रोजी पहाटेच्या सुमारास तब्बल नऊ घरफोड्या झाल्या होत्या. त्यात सोन्याचे दागिने, रोकड असा लाखोंचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला होता. आताही मंगळवारी पहाटेच्या सुमारास याच भागातील अर्चना स्टोअर्सलगतच्या गल्लीतील एका घरात पुन्हा घरफोडी झाली. यातील दोन चोरट्यांना अटक करून विक्रोळी न्यायालयात हजर केले आहे.
अब्दुल्ला वशी उल्ला खान आणि महम्मद कमाल अन्वर हुसेन खान अशी त्यांची नावे आहेत. यातील अब्दुल्ला हा शिवाजीनगर, गोवंडी येथील लोटस कॉलनीत राहतो. तर महम्मद हा शिवाजीनगर भागातच राहतो. त्यांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास घर बंद असल्याने घरफोडी केली. मात्र अरुंद गल्ली आणि कोयंडा तोडताना झालेल्या आवाजाने स्थानिक नागरिकांनी त्यांना आरडाओरडा करून जागेवरच पकडले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल माहिती आणि पार्श्वभूमी तपासली, अशी माहिती पंतनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक लता सुतार यांनी दिली. दरम्यान, या आरोपींनी एकूण ३७ हजारांचा मुद्देमाल चोरला होता. त्यातील सहा हजार ८०० रुपयांची रोकड पोलिसांनी आरोपीकडून जप्त केली असून, सोन्याची कर्णफुले अद्याप हस्तगत केलेली नाहीत. तीही लवकरच ताब्यात घेऊ, असा विश्वास लता सुतार यांनी व्यक्त केला आहे.
यापूर्वी एकाच रात्रीत नऊ घरफोड्या
मंडळवारी घरफोडी झालेल्या घरापासून हाकेच्या अंतरावर यापूर्वी एकाच रात्रीत तब्बल नऊ घरफोड्या झाल्या होत्या. सम्राट अशोक चाळ आणि नवरत्न चाळ येथील नऊ घरांची कुलपे तोडून चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने तसेच रोकडसह इतरही मौल्यवान सामान चोरले होते. रहिवासी लालबिहारी गुप्ता यांच्या घरातील कपाटातून एक सोन्याची चेन, दोन अंगठ्या असा ऐवज लांबवला होता. तसेच शिवशरण, हिराबाई शार्दुल, दौंडकर यांच्यासह इतर रहिवाशांचा ऐवज आणि रोकड लांबवली होती.