तिसऱ्या मुंबईसाठी नवा रेल्वे कॉरिडॉर
ग्रीनफिल्ड मार्ग, आधुनिक सिग्नलिंग, मेट्रोसारखे जाळे उभारण्यावर भर; एमयूटीपी-४ अंतर्गत एमआरव्हीसीचा तांत्रिक अभ्यास
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मुंबई महानगर प्रदेशाची लोकसंख्या आणि औद्योगिक वाढ पुढील काही वर्षांत झपाट्याने होईल, याचा अंदाज लक्षात घेऊन राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाने तिसऱ्या मुंबईसाठी स्वतंत्र, आधुनिक आणि भविष्योन्मुख रेल्वे कॉरिडॉर तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, नव्या औद्योगिक संधी, लॉजिस्टिक्स पार्क आणि वाढत्या वसाहती यामुळे या पट्ट्यात प्रवासीसंख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या वाढीला आधार देण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) एमयूटीपी-४अंतर्गत व्यापक तांत्रिक अभ्यास सुरू केला आहे.
या अभ्यासासाठी देश-विदेशातील आठ अग्रगण्य कंपन्यांनी बोली दाखल केली आहे. सिग्नलिंग, तांत्रिक रचना आणि नेटवर्क इंटिग्रेशनमध्ये अनुभव असलेल्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यादेखील या प्रक्रियेत आहेत. एमआरव्हीसी सध्या भू-अभ्यास, प्रवासी क्षमता, वाहतूक घनता, कॉरिडॉरची संकल्पना आणि तांत्रिक व्यवहार्यता यांचा तपशीलवार अभ्यास करणार आहे.
तिसरी मुंबई नवे विकास केंद्र
तिसऱ्या मुंबईचा मूळ पट्टा म्हणजे कर्नाळा-साई-चिरनेर (केएससी) न्यू टाऊन आणि आसपास विकसित होणारे नागरी क्षेत्र. पुढील दशकात हे संपूर्ण क्षेत्र एमएमआरमधील सर्वाधिक वाढीचे केंद्र ठरणार आहे. अटल सेतू, विमानतळ, डेटा सेंटर पार्क, औद्योगिक क्लस्टर, स्मार्ट टाऊनशिप आणि मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे इथे रोजगार आणि निवासाच्या संधी जलद वाढत आहेत. या विस्ताराला सक्षम आधार देण्यासाठी मजबूत, सुरक्षित आणि जलद स्थानिक रेल्वे जोडणी आवश्यक झाली आहे. एक वरिष्ठ रेल्वे अधिकारी म्हणाले, की उपनगरी रेल्वे हे मुंबई प्रदेशाचे मुख्य जीवनवाहिनीसारखे आहे. लोकल नेटवर्क तिसऱ्या मुंबईपर्यंत गेल्यास रोजगार, उद्योग आणि वाहतूक व्यवस्थेचे संपूर्ण चित्र बदलू शकते.
आधुनिक तंत्रज्ञानयुक्त रेल्वे
एमयूटीपी-४मध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित रेल्वे व्यवस्थेवर विशेष भर आहे. त्यात प्रमुख म्हणजे कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी)-कॅब सिग्नलिंगवर आधारित ही प्रणाली ट्रेनमधील हेडवे कमी करते आणि गाड्या नियमित अंतराने चालवणे सोपे करते. सीबीटीसी आणि कवच एकत्र लागू झाल्यास पुढील सुरक्षित आणि कार्यक्षम उपनगरी सेवा उपलब्ध होऊ शकते. अधिकाऱ्यांच्या मते, भविष्यात १५-कोच लोकल, अधिक एसी लोकल आणि ३ ते ५ मिनिटांच्या अंतरावर लोकल चालवणे शक्य आहे.
संभाव्य प्रमुख कॉरिडॉर
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ-केएससी न्यू टाऊन लोकल मार्ग
- उलवा-शिर्डोन-चिरनेर ग्रीनफिल्ड कॉरिडॉर
- पनवेल-विरार जलद लोकल मार्गाचा विस्तार
- सीवूड्स-खारघर-कळंबोली-केसीएस जोडणी
- अटल सेतूमार्गे साकळी-शिवडी-थर्ड मुंबई रेल्वे लिंक
- मध्य-पश्चिम रेल्वे लोकल कनेक्टिव्हिटी
- मेट्रोसारखी प्रवेश नियंत्रित स्थानके
- पूर्ण ग्रीनफिल्ड स्थानकांची उभारणी
मोठी आर्थिक गुंतवणूक
एमएमआरडीएने अलीकडेच ४.०७ लाख कोटी रुपयांच्या पायाभूत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार केले आहेत. यात स्मार्ट सिटी, औद्योगिक क्लस्टर, डेटा सेंटर पार्क, हरित वाहतूक, ऊर्जा प्रकल्प, गृहनिर्माण आणि मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी यांचा समावेश आहे.तिसऱ्या मुंबईला या गुंतवणुकीचा मोठा फायदा होणार आहे. अधिकाऱ्यांच्या मते, नव्या शहरांचे नियोजन ऊर्जा-कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित असेल. या सर्व विकासाचा केंद्रबिंदू रेल्वे कॉरिडॉर असेल.
अहवालासाठी दोन-तीन वर्षे
सध्या प्रकल्पाचे टर्म्स ऑफ रेफरन्स अंतिम करण्यात येत आहेत. व्यवहार्यता अहवाल, मार्ग सर्व्हे, तांत्रिक चाचण्या आणि अंदाजपत्रक तयार होण्यासाठी साधारण दोन ते तीन वर्षे लागतील. त्यानंतरच कॉरिडॉरची अंतिम रचना, स्थानके, खर्च आणि कामाचे टप्पे स्पष्ट होतील. अधिकाऱ्यांच्या मते, हा अहवाल थर्ड मुंबईच्या भविष्यातील वाढीसाठी कोणते रेल्वेमार्ग सर्वाधिक उपयुक्त ठरतील, हे ठरवेल.